लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीमार्फत रविवार, दि. २८ फेब्रुवारी रोजी येथील शाहू स्मारक भवन येथे सकाळी १० वाजता छोट्या मुलांसाठी एअरबड हा बालचित्रपट विनामूल्य दाखविण्यात येणार आहे.
कोरोनाच्या विषाणूमुळे प्रत्यक्ष चित्रपट दाखविण्यात येत नसल्यामुळे लॉकडाऊनमध्ये चिल्लर पार्टीतर्फे छोट्या मुलांसाठी ४७ चित्रपट ऑनलाइन पद्धतीने दाखविण्यात आले. दर महिन्याच्या चौथ्या रविवारी चित्रपट दाखविण्याच्या प्रथेप्रमाणे फेब्रुवारी महिन्यातील चित्रपट येत्या रविवारी दाखविण्यात येणार आहे. शासकीय नियमानुसार शारीरिक अंतर राखून, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करून हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. पालकांनी याची खबरदारी घेऊन हा चित्रपट पाहण्यासाठी मुलांना घेऊन यावे, असे आवाहन चिल्लर पार्टीतर्फे करण्यात आले आहे.
‘बडी’ हा एका जोकरचा कुत्रा असतो. तो जोकरला छोट्या-छोट्या कार्यक्रमात मदत करत असतो. पण, जोकर बडीला चांगली वागणूक देत नसतो. एकदा अपघाताने बडीचा पिंजरा जोकरच्या गाडीतून खाली पडतो व बडीची सुटका होते. तो एका पडक्या घरामागे झाडीत लपून बसतो. झाडीजवळच्या रिकाम्या जागेत ‘जोश’ हा छोटा मुलगा बास्केटबॉलचा सराव करत असतो. कारण, त्याला शाळेच्या संघात घेतलेले नसते. इथे जोश व बडीची मैत्री होते. जोश बडीला घरी घेऊन येतो. पण, घरातील इतर लोक त्याला घरात घ्यायला तयार नसतात. काही दिवसांनी त्याच्या चांगल्या वागणुकीमुळे त्याला घरात प्रवेश मिळतो. बडीबरोबरच्या सरावामुळे जोशलाही शाळेच्या संघात प्रवेश मिळतो. बडीच्या खेळाचा गवगवा सर्वत्र होत असतो. बडीचा पत्ता समजल्यामुळे जोकर त्याला घेऊन जायला येतो. एका महत्त्वाच्या सामन्यात जोशच्या संघाला बडी आपल्या एअरजंपने सामना जिंकून देतो. बडी जोशजवळ राहतो की जोकर घेऊन जातो? हे पाहण्यासाठी आणि बडीची ही एअरजंप पहायला बालमित्रांना घेऊन या, असे आवाहन चिल्लर पार्टीतर्फे करण्यात आले आहे.
-------------------------
चित्रपट : एअरबड
वेळ : सकाळी १० वाजता
दिनांक : २८/०२/२०२१
स्थळ : शाहू स्मारक भवन, कोल्हापूर.
-------------------------
फोटो - २५०२२०२१-कोल-एअरबड-फिल्म
(संदीप आडनाईक)
===Photopath===
250221\25kol_3_25022021_5.jpg
===Caption===
25022021-Kol-Airebud film.jpg