उचगाव : कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणासाठी अतिरिक्त चौसष्ट एकर जमिनीची मोजणी गुरुवारी भूमिअभिलेख कार्यालय व महसूल विभागातील कर्मचाऱ्यांकडून सुरू झाली आहे. साहेब पोटच्या पोरांवाणी सांभाळलेली जमीन तुमच्या हवाली करतोय, इथंन पुढचं बी दिवस चांगलं येऊ देत, विकासकामांसाठी जमीन देण्यासाठी आमचा विरोध नाही; पण इथल्या भूमिपुत्रांना न्याय द्या, जमिनीचा भाव चांगला मिळावा अशी आर्त विनवणी गडमुडशिंगी गावच्या शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांकडे केली. गुरुवारी (दि.१०) सकाळी साडेअकराच्या दरम्यान सुरू झालेले मोजणीचे काम सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत सुरू होते.
एकाच दिवसात मोजणी शक्य होणार नसल्याने
शनिवार (दि. १२)पर्यंत ही मोजणी सुरू राहणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
येथील शेतकऱ्यांनी आपापल्या बांधावर जाऊन दिशादर्शक सूचना केल्या, तर मोजणीच्या ठिकाणी खातेदारांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. या मोजणीसाठी गडमुडशिंगी महसूल विभागातील पंधराशेहून अधिक खातेदारांना नोटिसा काढण्यात आल्या होत्या. यापैकी बाराशेहून अधिक खातेदारांनी प्रत्यक्ष मोजणीच्या ठिकाणी उपस्थिती दर्शवीत आपली मिळकत भूसंपादन यामध्ये समाविष्ट होते की नाही याची शहानिशा केली. परंतु, आणखीन दोन दिवस मोजणी प्रक्रिया सुरू राहणार असल्यामुळे याबाबतचे अंतिम चित्र शनिवार नंतरच स्पष्ट होणार आहे. महसूल विभागातील अत्याधुनिक डीजीपीएस व ईटीएस मशीनद्वारे मोजणी करण्यात येत आहे.
चौकट : मिळकतधारकांमध्ये संभ्रमावस्था
मोजणीच्या ठिकाणी उपस्थित खातेदारांना आपल्या संपादित मिळकतींचा मोबदला कसा व किती मिळणार याबाबत संभ्रमावस्था होती. काही खातेदारांनी आपल्या मिळकतींचा योग्य मोबदला न मिळाल्यास प्रकल्पग्रस्त खातेदारांची कृती समिती स्थापन करून आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी संघर्ष करण्याचा इशारा दिला आहे.
यावेळी मोजणीच्या ठिकाणी भूमी अभिलेख करवीरचे उपअधीक्षक सुधाकर पाटील, भूकरमापक अमर सोळांकूरकर, सचिन जाधव, नितीन कुंभार, गणेश कांबळे, श्रीमती वंदना बेलकर, महसूल विभागातील गडमुडशिंगीच्या मंडळ अधिकारी अर्चना गुळवणी, तलाठी संतोष भिउंगडे, कोतवाल युवराज वड्ड व शिपाई शिवाजी कांबळे, आदी उपस्थित होते.
चौकट: नऊ गावच्या जमिनी : नोकरभरतीत ठेंगा
विमानतळ विस्तारीकरणामध्ये गडमुडशिंगी, उचगाव, उजळाईवाडी, सरनोबतवाडी, गोकुळ शिरगाव, कणेरीवाडी, नेर्ली, तामगाव, सांगवडे येथील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, पण मोबदल्यात रक्कम मिळते; पण ही रक्कम आयुष्यभर पुरत नाही, तेव्हा विमानतळ कार्यालयात शेतकऱ्याच्या भूमिपुत्राला नोकरी मिळणे आवश्यक आहे, असा सूर उमटला. गडमुडशिंगी गावची विमान विस्तारीकरणात ६४ एकर जमीन संपादित होत आहे. येथे १०० वर्षांपासून लक्ष्मीवाडी (मातंग) वसाहत आहे. येथील नागरिकांना नोटिसा दिल्या आहेत. लोकांचे पुनर्वसन केल्याशिवाय व स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करून देण्याविषयी लेखी हमी दिल्याशिवाय जमीन संपादन प्रक्रिया होऊ देणार नसल्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
फोटो : १० विमानतळ मोजणी
ओळ
गडमुडशिंगी येथे विमानतळ विस्तारीकरणासाठी आवश्यक अतिरिक्त ६४ एकर जमिनीची अत्याधुनिक मशीनद्वारे मोजणी करताना भूमी अभिलेख करवीरचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.