कोल्हापूर : विमानतळ विस्तारीकरणासाठी संपादित केलेल्या वन विभागाच्या जमिनीचे दोन कोटी लवकरच राज्य शासनाकडून वर्ग केले जाणार आहेत, अशी माहिती आमदार अमल महाडिक यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. वाढीव धावपट्टीसाठी ६४ एकर जमिनींचा प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहितीही निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात कोल्हापूर विमानतळासंदर्भातील प्रश्नांसंदर्भात आमदार अमल महाडिक यांनी बैठक आयोजित केली होती. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, कोल्हापूर विमानतळ व्यवस्थापक पूजा मूल, करवीरचे प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन गिरी, सार्वजनिक विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय भोसले, विमानतळ सल्लागार समिती सदस्य समीर शेठ, आदी प्रमुख उपस्थित होते.विमानतळासाठी वनविभागाची जमीन संपादित केली होती. त्याचे १ कोटी ९० लाख रुपये राज्य शासनाकडून देणे बाकी होते; ते वनविभागाला वर्ग केले असून ते लवकरच मिळतील, असे आमदार महाडिक यांनी सांगितले. विमानोड्डाणामध्ये महावितरण, बी. एस. एन. एल. व मोबाईलचे टॉवर व खांबांचे १६८ अडथळे असून संबंधित विभागांनी त्यांची संयुक्त पाहणी करून ते काढावेत, अशा सूचना देण्यात आल्या. विमानतळ येथे जे पाणी आवश्यक आहे त्याचा महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाने पुरवठा करावा; तसेच परिसरात बंदिस्त विहिरीकरिता जागेसाठी सर्व्हे करावा, अशा सूचना महाडिक यांनी संबंधितांना दिल्या.निवासी उपजिल्हाधिकारी शिंदे यांनी वाढीव धावपट्टीसाठी ६४ हेक्टर जमिनीसंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे पाठविला असल्याची माहिती दिली.
‘विमानतळ’ जमीनप्रश्नी दोन कोटी ‘वन’ला देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2018 12:46 AM