कोल्हापूर : केंद्र सरकारने संमत केलेला नागरिकत्व सुधारणा कायदा व राष्ट्रीय नागरिकत्व नोंद या दोन्ही कायद्याला विरोध करत ते रद्द करावेत, या मागणीसाठी ‘एआयएसएफ’ व ‘एआयवायएफ’ या संघटनांकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर शनिवारी धडक मोर्चा काढण्यात आला. या ठिकाणी जोरदार निदर्शने करत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला.सकाळी साडे अकराच्या सुमारास बिंदू चौक येथून गिरिष फोंडे, अतुल आंबी, शिवाजी माळी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला सुरुवात झाली. ‘नागरिकत्व सुधारणा कायदा व राष्ट्रीय नागरिकत्व नोंद हे कायदे रद्द करा...’,‘मोदी-शहा मुर्दाबाद...’, ‘भाजप सरकार चलेजाव...’,‘इन्कलाब झिंदाबाद...’अशा घोषणा देत आंदोलकांनी मोर्चा मार्ग दणाणून सोडला. लक्ष्मीपुरी, व्हिनस कॉर्नर, बसंत-बहार टॉकीजमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला.
या ठिकाणी आंदोलकांनी जोरदार घोषणा देत तीव्र निदर्शने केली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनात आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (एआयएसएफ), आलॅ इंडिया युथ फेडरेशन (एआयवायएफ) च्या कार्यकर्त्यांसह नेहरु महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते.यानंतर मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना सादर करण्यात आले. निवेदनात म्हंटले आहे की, लोकसभेतील पाशवी बहुमताच्या जोरावर राज्यसभेतील जेमतेम जोरावर गृहमंत्री अमित शहा यांच्या पुढाकाराने ‘नागरिकत्व सुधारणा कायदा व राष्ट्रीय नागरिकत्व नोंद’ हे दोन्ही कायदे संमत करण्यात आले. त्याला देशभरातून विरोध सुरु झाला आहे. अनेक विद्यार्थ्यांना पोलीसांकडून मारहाण केली आहे.
या अमानुष छळाचा आम्ही निषेध करतो. त्यामुळे हे दोन्ही कायदे त्वरीत मागे घेऊन विद्यार्थी व नागरिकांना झालेल्या मारहाणीची चौकशी करुन संबंधितांना शिक्षा करावी. अन्यथा देशभर आंदोलनाची व्यापकता वाढविली जाईल. आंदोलनात जावेद तांबोळी, आरती रेडेकर, धीरज कठारे, अरबाज पठाण, दिलदार मुजावर, कृष्णा पानसे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.