कोल्हापूर : हळदी (ता. करवीर) येथील ऐश्वर्या जयसिंग नाईक हिने दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क या पदाच्या परीक्षेत दुसऱ्यांदा बाजी मारली आहे. एमपीएससीकडून जाहीर झालेल्या ऑनलाईन निकालात तिने २०० पैकी १२६ गुणांची कमाई करीत खेळाडू प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक पटकविला आहे.एमपीएससीकडून या पदासाठी मे २०१९ मध्ये पूर्व, तर ऑक्टोबरमध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली. ऐश्वर्या सध्या कोल्हापुरातील रंकाळा टॉवर परिसरात राहते. ती ४०० आणि ८०० मीटर धावणे प्रकारातील खेळाडू असून, तिने राज्यस्तरीय, राष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धांमध्ये यश मिळविले आहे. वेस्टर्न रिजन स्पोर्ट्स फाऊंडेशनची ती खेळाडू आहे.
तिचे प्राथमिक शिक्षण विद्यामंदिर हळदी येथे, तर कोल्हापुरातील पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण झाले. न्यू कॉलेजमधून बी.ए. (अर्थशास्त्र) ची पदवी घेतल्यानंतर तिने स्पर्धा परीक्षा देण्यास सुरुवात केली. त्यात दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क या पदाच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात ती यशस्वी ठरली. पण, पुढे शिक्षण घ्यायचे असल्याने ती या पदावर रुजू झाली नाही.
गडहिंग्लज येथील शिवराज महाविद्यालयातून एम.ए. चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुन्हा स्पर्धा परीक्षा दिली. त्यात आता दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क या पदाच्या परीक्षेत बाजी मारली आहे. तिचे वडील जयसिंग हे वेंगुर्ला येथे क्रीडाशिक्षक असून, आई नीता या गृहिणी आहेत.
दरम्यान, या परीक्षेच्या तयारीसाठी यवेस्टर्न रिजनचे अश्र्लेश मस्कर , अभिजित मस्कर, स्टडी सर्कलचे राहूल पाटील, शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक जयकुमार देसाई, मनोहर भोळे, महेश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभल्याचे ऐश्वर्या हिने सांगितले.
यश मिळाल्याचा खूप आनंद होत आहे. या पदावर मी रुजू होणार आहे. क्लास वन ऑफिसर होण्याचे ध्येय असून, त्यासाठी यापुढेही तयारी करणार आहे.-ऐश्वर्या नाईक