लोकमत न्यूज नेटवर्क
आजरा : आजरा नगर पंचायतीचे उपनगराध्यक्ष विलास नाईक यांनी आपल्या पदाचा राजीनामा नगराध्यक्ष ज्योत्स्ना चराटी यांच्याकडे दिला. नवीन उपनगराध्यक्ष पदासाठी अनिरुद्ध उर्फ बाळ केसरकर व संजीवनी सावंत इच्छुक आहेत. मंगळवार (दि. २९) रोजी उपनगराध्यक्ष निवडीची बैठक होण्याची शक्यता आहे.
आजरा नगर पंचायतीच्या निवडणुकीनंतर पहिले २२ महिने आलम नाईकवाडे हे उपनगराध्यक्ष होते. सत्तारूढ व विरोधकांमधील समझोता एक्सप्रेसनंतर १०-१० महिन्यांसाठी उपनगराध्यक्षपद देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पहिल्या १० महिन्यांसाठी विलास नाईक यांना संधी देण्यात आली. आपला १० महिन्यांचा कालखंड संपल्यानंतर नाईक यांनी राजीनामा दिला आहे. तो नगराध्यक्ष ज्योत्स्ना चराटी यांनी स्वीकारला आहे.
नवीन उपनगराध्यक्ष पदासाठी अनिरुद्ध उर्फ बाळ केसरकर व संजीवनी सावंत इच्छुक आहेत. मात्र, अनिरुद्ध केसरकर यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. उपनगराध्यक्षपदाच्या निवडीची नोटीस उद्या (सोमवारी) काढली जाणार आहे. त्यानंतर सात दिवसांनी म्हणजे मंगळवार (दि. २९) जूनला नूतन उपनगराध्यक्षांची निवड होण्याची शक्यता आहे.