कोल्हापूर : येथील मिरजकर तिकटी परिसरातील श्री एकमुखी दत्त मंदिराच्या कलशारोहण सोहळ््यात मंगळवारी अभिनेता अजय देवगण व काजोल यांनी होमहवन आणि कलशपूजन विधी केले. तत्पूर्वी त्यांनी अंबाबाई मंदिरात जाउन देवीचे दर्शन घेतले. त्यांना पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.
मिरजकर तिकटी येथील श्री एकमुखी दत्त मंदिराचा कलशारोहण सोहळा मंगळवारी मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ््यात अभिनेता अजय व काजोल देवगण यांनी होमहवन आणि कलशपूजन विधी केले.श्री एकमुखी दत्त आखाडा सेवाभावी संस्थेच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी सहा वाजता लघुरुद्र अभिषेक झाला. अकरा वाजता पुण्यवाचन व अष्टगंध मार्चन दत्तमहायाग हे विधी झाले.
साडेबाराच्या दरम्यान अभिनेता अजय व काजोल यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाले. येथे त्याच्या हस्ते होमहवन व कलशाचे पूजन करण्यात आले. त्यांना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
आधी अंबाबाईचे दर्शन..अजय आणि काजोल यांची अंबाबाईवर नितांत श्रद्धा आहे. वर्षातून एकदा तरी ते देवीच्या दर्शनासाठी येतात. विमानतळावर उतरल्यानंतर त्यांनी थेट अंबाबाई मंदिर गाठले.
देवीचे दर्शन घेतल्यानंतर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी समितीच्यावतीने त्यांचा सत्कार केला. यावेळी सदस्या संगीता खाडे, किरण नकाते आदी उपस्थित होते.