संदीप आडनाईक कोल्हापूर : सामान्य विद्यार्थ्याला अनेकजण सहजपणे शिकवू शकतात परंतु स्वतः विकलांग असताना विद्यार्थ्यांना शिकवणे हे ध्येय उराशी बाळगून कोल्हापुरातील अजय वणकुद्रे या विशेष शिक्षकाने गेली तेरा वर्षे प्रचंड मेहनत करून बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना स्वतःसारखेच स्वतःच्या पायावर उभे राहण्याची उमेद दिली. आज त्यांचे हे विद्यार्थी भले मोठ्या पदावर नसतील परंतु आपला स्वतःचा संसार सांभाळण्यास समर्थ बनले आहेत. त्यामागे या अंध असलेल्या शिक्षकाची तपश्चर्या आहे. त्यांच्या ध्यासामुळे आत्तापर्यंत शेकडो विद्यार्थ्यांना यशाची वाट सापडली आहे. मूळचे सांगली जिल्ह्यातील अंकलखोप येथील वणकुद्रे यांचे वडील पीएसआय असल्यामुळे राज्यभर नोकरीसाठी फिरले. १९७८ मध्ये त्यांची बदली कोल्हापुरात झाली. तेव्हा त्यांनी जुना बुधवार पेठेत वास्तव्य केले, ते कुटुंब आज अखेर या जागेत राहत आहेत. अजय यांना दोन बहिणी आणि चार भाऊ.. येथील वास्तव्यात वडिलांचे त्याच वर्षी निधन झाले. साऱ्या जबाबदाऱ्या गृहिणी असलेल्या आईवर येऊन पडली. त्यांनी मुलांना शिकवून मोठे केले. लहानपणापासून हुशार असलेल्या अजयला शिकायचे होते, म्हणून त्याला बुरुड गल्लीतील राजश्री शाहू हायस्कूलमध्ये घातले. परंतु दहावीत असताना १९८० मध्ये टायफाईडमुळे ७० टक्के नजर गेली. शिक्षकांनी अंध मुलाला शिकवता येत नसल्याचे सांगून घरी राहायला सांगितले. त्यामुळे शिक्षण थांबले. दोन वर्षे उपचार घेतले पण दृष्टी परत येणार नाही हे समजल्यानंतर त्याला सामोरे जात खटपट करून धडपड्या अजयने बोर्डात जाऊन माहिती घेतली आणि १७ नंबर फॉर्म भरून परीक्षा दिली. त्यात ६० टक्के गुण मिळवले. पुढे नाईट कॉलेजमध्ये जाऊन अकरावी आणि बारावीचे शिक्षण पूर्ण केले. नुकतेच अंधत्व आल्याने हालचालीवर मर्यादा पडल्या. पण बारावीला रायटर घेऊन ५४ टक्के गुण मिळवले. याच काळात नॅब या संस्थेशी संपर्क आला. तेथे १२ वर्षे शिपाई म्हणून नोकरी केली, पण शिकण्याची उमेद शांत बसू देत नव्हती. नोकरी करत करत बीए पूर्ण केले.
बीएड झालेला पहिला दिव्यांग२००९ मध्ये इग्नो या दिल्लीच्या संस्थेत विशेष बीएड साठी प्रवेश मिळवला. दिल्लीत जाऊन प्रशिक्षण पूर्ण केले आणि २०११ मध्ये ७१ टक्के गुणांनी पदवी घेतली. पहिल्या सहा क्रमांकात अजय पाचवा होता आणि तोही एकमेव दिव्यांग. पुढे २०१५ मध्ये त्याने जॉर्ज या सॉफ्टवेअरच्या साह्याने एमएसआयटी परीक्षा उत्तीर्ण केली, तेव्हाही तो राज्यातील पहिला दिव्यांग ठरला.
शिक्षण संचालकांनी दिली संधीकोल्हापुरात जिल्हा परिषदेच्या जागा निघाल्या तेव्हा २०१२ मध्ये अंध प्रवर्गात विशेष शिक्षकाची जागा मिळाली. तत्कालीन शिक्षण संचालकांनी अजयला विकास हायस्कूल मध्ये नेमणूक दिली. २०२० पर्यंत या पदावर अजयने काम केले. त्यानंतर महापालिका प्राथमिक शिक्षण समितीकडे त्यांची विशेष युनिट मध्ये बदली केली.
स्वयंसेवी संस्थेमार्फत सामाजिक कामनॅब, सक्षम, अंध युवक मंच, स्पर्श ज्योत फाऊंडेशन, अंध शाळा अशा स्वयंसेवी संस्थेमार्फत त्यांचे सामाजिक काम सुरू आहे.
हजारो दिव्यांगाना उभे केलेअजय यांनी आज पर्यंत १०० हून अधिक दिव्यांग विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे केले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बहुजन समाजातील दिव्यांग विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाची उमेद त्यांनी दिली आहे.
लवटे सरांनी लाऊन दिले लग्नअंध व्यक्तीशी लग्न कोण करणार ही चिंता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी दूर केली. तत्कालीन जिल्हाधिकारी अजितकुमार जैन यांच्या उपस्थितीत १९९९ मध्ये बाल कल्याण संकुलातील अनाथ मुलीशी त्यांचा विवाह लाऊन दिला. पत्नीही ४० टक्के अपंग आहे. आज त्यांचा संसार सुखाचा आहे. त्यांच्या मुलीच्या लग्नाच्या उत्तरदायित्वामधून ते मोकळे झाले आहेत.