येथील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचा बी. ई. मेकॅनिकलचा विद्यार्थी अजिंक्य संजय पाटील याने तृतीय वर्ष परीक्षेत शिवाजी विद्यापीठात प्रथक क्रमांक मिळवत 'यशवंतराव पांडुरंगराव पवार' पारितोषिकावर नाव कोरले आहे. सलग तिसऱ्यावर्षी मेकॅनिकल विभागात विद्यापीठात अव्वल येण्याचा मान त्याने मिळवला आहे.
मेकॅनिकल विभागात विद्यापीठात अव्वल स्थान मिळवणाऱ्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना 'यशवंतराव पांडुरंगराव पवार' पारितोषिकाने सन्मानित केले जाते. या तिन्ही वर्षांमध्ये विद्यापीठात 'टॉप' राहून अजिंक्यने यशाची हॅट्ट्रिक साधली आहे.
याच महाविद्यालयाची बी. ई. सिव्हिलची विद्यार्थिनी प्राजक्ता प्रकाश खाडे हिला कन्स्ट्रक्शन प्रॅक्टिस विषयात सर्वप्रथम आल्याबद्दल 'राधा-माधव प्राईझ' आणि 'स्व. शंकरराव रामराव नागेशकर स्मृती पुरस्कार', तर डिझाईन ऑफ कॉन्क्रिट स्ट्रक्चर-२ या विषयात सर्वोत्तम गुण मिळाल्याबद्दल 'प्रा. सी. जी. काळे' पुरस्कार जाहीर झाले आहेत. तर मेकॅनिकल विभागाच्या आदिती मदन खेडेकर हिने द्वितीय वर्ष परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवल्याने 'यशवंतराव पांडुरंगराव पवार' पुरस्कार जाहीर झाला आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी अध्यक्ष डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोषकुमार चेडे यांनी अभिनंदन केले आहे.