कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज अवैध ठरलेले अजित पाटील, भारती डोंगळे व यशवंत नांदेकर हे आज, गुरुवारी विभागीय उपनिबंधक (दुग्ध) सुनील शिरापूरकर यांच्याकडे दाद मागणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन हरकत घेऊन झुमव्दारे सुनावणी घेण्याची तयारी दुग्ध विभागाने केली आहे.
‘गोकुळ’च्या छाननीत दूध पुरवठा व पशुखाद्याची खरेदी या दोन मुद्द्यांवर अनेकांचे अर्ज अपात्र ठरले होते. याविरोधात अनेकांनी दुग्ध विभागाकडे दाद मागण्याची तयारी केली आहे. अजित पाटील, भारती डोंगळे व यशवंत नांदेकर यांनी एकत्रितपणे दाद मागण्याची तयारी केली असून, आज ते पुणे येथे जाऊन विभागीय उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांच्याकडे दाखल करणार आहेत.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून दुग्ध विभागाने ऑनलाईन हरकती मागवल्या आहेत. त्याचबरोबर झूमव्दारे सुनावणीची प्रक्रिया राबवण्याची तयारी केली आहे.