तळतळाट लागेल, कोल्हापूरच्या ढाण्या वाघाला बाजूला ठेवलंय; अजित पवारांची कोपरखळी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 05:18 PM2022-12-28T17:18:17+5:302022-12-28T17:18:51+5:30
उपहासात्मक कळवळा दाखवत पवार यांनी फडणवीसांना काढला चिमटा
नागपूर/ कोल्हापूर : कोल्हापूरच्या ढाण्या वाघाला एक, दोन खाती देऊन बाजूला ठेवलंय, तळतळाट लागेल तुम्हांला अशी उपहासात्मक कोपरखळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंगळवारी अधिवेशनात लगावली.
अधिवेशनात मंत्रिमंडळाचा विस्तार, महिलांना न मिळालेली संधी, अनेक खात्यांचा एकाच मंत्र्याकडे कार्यभार यावरून टोलेबाजी करताना उपहासाने का असेना उल्लेख करत पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्या दुखऱ्या नसीवरच बोट ठेवले. कारण मंत्रिमंडळात समावेश होण्यासाठी पाटील यांना दिल्लीवारी करावी लागली होती. मग त्यांचा समावेश करण्यात आला. परंतु त्यांना मनासारखं खातं दिलं नाही हे वास्तव आहे. पक्षातही त्याना बाजूला केल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे.
या पार्श्वभूमीवर पवार म्हणाले, तुम्हा दोघांचं बरं चाललंय. मुख्यमंत्र्यांना विचारलं की ते म्हणतात फडणवीसांनी मला सांगितले म्हणून मी केले आणि फडणवीसांना काही विचारले की ते म्हणतात मुख्यमंत्र्यांची संमती आणा. दादा तुमची मला कधी कधी इतकी आठवण येते. तुमच्यासारखी व्यक्ती असती, तर अशी टोलवाटोलवी केली नसती. कोल्हापूरच्या या ढाण्या वाघाला केवळ एक, दोन साधी खाती, विभाग देऊन बाजूला ठेवलं आहे आणि स्वत: सहा सहा खाती घेतली आहेत. या पद्धतीचे राजकारण करता. अशाने तळतळाट लागेल तुम्हांला.
पाटील यांनी गेल्या आठ वर्षांत पवार कुटुंबीयांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नव्हती. परंतु त्यांच्याविषयी उपहासात्मक कळवळा दाखवत पवार यांनी फडणवीसांना चिमटा काढण्याची संधी सोडली नाही.