कऱ्हाड : शिवनगर, ता. कऱ्हाड येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या ५५ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व माजी सहकार मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर, आमदार बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार, दि. २३ रोजी सकाळी दहा वाजता होणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी दिली. अविनाश मोहिते म्हणाले, ‘यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याचा हा ५५ वा गळीत हंगाम आहे. गेले साडेचार वर्षे कारखान्याचा कारभार संस्थापक पॅनेल सांभाळत आहे. कारखान्याने आजपर्यंत इतर कारखान्यांच्या बरोबरीने ऊसदर दिला आहे. कृष्णा कारखान्यातील सत्तांतरानंतर चार वर्षांत मोठ्या प्रमाणात उसाचे गाळप केलेले आहे. प्रतिवर्षी ११ लाख मेट्रिक टनापेक्षा अधिक ऊस गाळप केले. गतवर्षी एक टिपरीही गेटकेन ऊस न आणता कार्यक्षेत्रातील संपूर्ण उसाचे गाळप करून कारखान्याने नावलौकिक मिळवताना शेतकऱ्यांमध्ये विश्वासाचे नाते निर्माण केले आहे. गेली साडेचार वर्षे यशस्वी कारभार केल्यानंतर औचित्य साधून यावर्षी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निमंत्रित करण्यात आले आहे. गळीत हंगाम शुभारंभाबरोबर कृष्णा कृषी महाविद्यालयाच्या शैक्षणिक संकुल उभारणी कामाचा कोनशिला समारंभ कार्यक्रमदेखील अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.’‘कारखान्याने चालू गळीत हंगामासाठी १२ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट नजरे समोर ठेवून सर्व तयारी केली आहे. गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमास कारखाना र्काक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक सभासद शेतकरी यांनी उपस्थित राहावे,’ असे आवाहनही अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
अजित पवार प्रथमच ‘कृष्णे’वर!
By admin | Published: November 19, 2014 10:08 PM