कोल्हापूर : कोल्हापुरातील किल्ले विशाळगड येथील अनधिकृत अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेला रविवारी हिंसक वळण लागले. विशाळगडाजवळील गजापुरात झालेल्या या हिंसाचाराच्या घटनेनंतर चार दिवसांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील आपले सर्व कार्यक्रम रद्द करून विशाळगडाजवळील गजापुरात पोहोचले आहेत.
अजित पवार यांनी हिंसाचारग्रस्त भागाची पाहणी करत पीडितांशी संवाद साधला. पीडितांनी झालेल्या नुकसानाची माहिती देताना कशा पद्धतीने हल्ला करण्यात आला. याची माहिती सांगितली. तसेच, इथल्या नागरिकांनी सरकारने योग्य मदत करावी आणि ज्यांनी हल्ला केला त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शिवाय, या परिसरातील संचारबंदी हटवण्याची मागणीही केली आहे.
यावेळी अजित पवार म्हणाले, मी आताच कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून माहिती घेतली आहे. विशाळगडावरील ज्या व्यवसायिक आस्थापना आहेत, जे अतिक्रमण झालं आहे. त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. तसेच, कोणत्याही घराला हात लावला जाणार नाही, असे अजित पवार यांनी यावेळी पीडितांना सांगितले.
दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून किल्ले विशाळगडावरील अतिक्रमणे हटवण्याची मागणी शिवप्रेमींनी केली होती. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही शिवप्रेमींना विशाळगड येथे येण्याचे आवाहन केले होते. त्यानंत विशाळगडाजवळील गजापुरात जमावाने केलेल्या दगडफेक, जाळपोळ केली. यामध्ये अनेक घरे, वाहनांचे नुकसान झाले.
शाहू महाराज छत्रपती यांनीही केली पाहणीविशाळगड हिंसाचारानंतर या भागाची खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्यासह इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी गजापुरात पाहणी केली होती. यावेळी त्यांना मदतीचा हात देखील देण्यात आला होता. यावेळी अनेकांचे संसार रस्त्यावर आल्याचे पाहायला मिळाले. महिलांना आक्रोश पाहून महाराज देखील गलबलून गेले होते. आक्रमक भूमिका घेतलेल्या छत्रपती संभाजीराजे यांच्या भूमिकेवर त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली.
तेढ निर्माण करणारे फोटो, व्हिडीओ व्हायरल केल्यास फौजदारी कारवाई!विशाळगड येथील अनधिकृत अतिक्रमणाबाबत काही घटकांकडून सामाजिक तणाव निर्माण करणारे चुकीचे संभाषण, चित्रीकरण, छायाचित्रे समाजमाध्यमांद्वारे प्रसारित केली जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यात कलम १६३ लागू केले आहे. याअंतर्गत इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, ट्विटर, फेसबुकद्वारे अफवा, जातीय द्वेष पसरवणारे संदेश पाठविणे, खोटी माहिती पोस्ट किंवा फॉरवर्ड करणे, तसेच बॅनर, फ्लेक्स, होर्डिंग लावण्यास सक्त मनाई केली असून, तसे आढळल्यास फौजदारी कारवाई करण्याचा आदेश दिला आहे.