छ. संभाजी महाराजांबाबतच्या 'त्या' वक्तव्यावरून संभाजीराजेंचा अजितदादांना सवाल; 'कोणता संदर्भ घेऊन बोललात?'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 01:32 PM2023-01-02T13:32:46+5:302023-01-02T14:05:18+5:30
जबाबदार पुढाऱ्यांनी विकृत बोलू नये
कोल्हापूर : राष्ट्रवादीचे नेते, आमदार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानाचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसत आहेत. भाजपा आध्यात्मिक आघाडीच्यावतीने तर अजित पवारांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. तर भाजपने राज्यात विविध ठिकाणी आंदोलने करत तीव्र निषेध केला. यातच आता यावर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही आपले मत व्यक्त केले आहे. कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
संभाजीराजे म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माचेही रक्षण केले हे कोणी नाकारु शकत नाही. म्हणून संभाजी महाराज स्वराज्यरक्षक आहेतच तर धर्मरक्षक देखील आहेत असे म्हणणे चुकीचे होणार नाही. अजित पवारांनी जे वक्तव्य केले ते चुकीचे आहे. याबाबत अनेक पुरावे आहेत. अजित पवारांनी कोणता संदर्भ घेवून हे विधान केले हे त्यांनीच सांगावे.
कोणतीही एतिहासिक घटना बोलायची असेल तर त्याचा अभ्यास पुर्ण केल्याशिवाय आपली प्रतिक्रिया देवू नये अशी अजित पवारांना माझी सूचना राहिल असेही ते म्हणाले. अजित पवार जे बोले ते अर्ध सत्य बोलले. जबाबदार पुढाऱ्यांनी विकृत बोलू नये. संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते अस जे विधान केले ते पुर्णपणे चुकीचे असल्याचेही संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.
काय म्हणाले होते अजित पवार
विधानसभेत बोलताना पवार म्हणाले, आपण महाराष्ट्रामध्ये राहत असून इथे अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात नाही. तसेच 'बाल शौर्य पुरस्कार' हा किमान स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते. त्यांनी धर्माचा कधीच पुरस्कार केला नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. संभाजी महाराजांचा उल्लेख हा स्वराज्यरक्षक असाच करावा, असेही अजित पवार यांनी म्हटले.