अजित पवार उद्या कोल्हापूर दौऱ्यावर, आमदार हसन मुश्रीफांच्या मतदारसंघात भरगच्च कार्यक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 02:15 PM2023-02-16T14:15:54+5:302023-02-16T14:16:18+5:30
गैबी चौकात जाहीर सभा
कागल : विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा शुक्रवार, दिनांक १७ रोजी होणारा कागल दौरा कार्यकर्त्यांनी यशस्वी करावा. विविध उद्घाटने आणि गैबी चौकात सायकांळी होणाऱ्या मेळाव्याला मोठी गर्दी होणार आहे. यावेळी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते कार्यकर्ते उपस्थितीत राहणार आहेत, अशी माहिती जिल्हा बँकेचे संचालक भय्या माने आणि माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर यांनी दिली.
कागल शहरातील श्रमिक वसाहत येथे राजमाता जिजाऊ माॅ साहेब उद्यान, बस स्थानकाजवळ जयसिंगराव घाटगे यांच्या पुतळ्याचे नव्याने केलेल्या सुशोभीकरण यांचे उद्घाटन आणि राधाकृष्ण मंदिर विस्तारित सभागृह या विकासकामांचा शुभारंभ ना.पवार यांच्या हस्ते आमदार हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
गैबी चौकात जाहीर सभा
यानंतर सायंकाळी सहा वाजता ऐतिहासिक गैबी चौकात जाहीर सभा होणार आहे. उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार यांनी चांगले काम केले आहे. आता विरोधी पक्षनेता म्हणूनही ते आक्रमक पद्धतीने काम करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या दौऱ्याची उत्सुकता सर्वांना लागली आहे, असेही भैय्या माने म्हणाले.