कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज मंगळवारी कोल्हापूर दौऱ्यावर येत असून सकाळी शिरोळ तालुक्यातील महापुराने झालेल्या नुकसानीची ते प्रथम पाहणी करणार आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकरही या पाहणी दौऱ्यात सहभागी होणार आहेत. सांगली-कोल्हापूरच्या पुराची पाहणी केल्यानंतर त्याचा अहवाल उपमुख्यमंत्री पवार हे बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडतील व त्यानंतरच पूरग्रस्तांना मदतीचा राज्य शासनाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
पवार सोमवारीच कोल्हापूर दौऱ्यावर येणार होते परंतु हा दौरा अचानक स्थगित करून ते सांगलीला गेले. सांगलीतून सातारा येथे मुक्कामास होते. सोमवारी सकाळी तिथून मोटारीने ते सकाळी ८ वाजता शिरोळला जाणार आहेत. तेथील पाहणी केल्यानंतर कोल्हापूर शहरातील पूरग्रस्त भागातील नागरिक व व्यापाऱ्यांना भेटणार आहेत. त्यानंतर शिवाजी पूल परिसरास भेट देऊन सकाळी ११ वाजता त्यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामधामवर महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीनंतर तिथेच पत्रकार परिषद होणार असून त्यानंतर भोजन करून ते मुंबईला रवाना होतील अशी माहिती मंत्री मुश्रीफ यांनी दिली आहे.