कोल्हापूर : आजरा साखर कारखान्याच्या थकित कर्जाच्या पुनर्गठनाविषयी प्रादेशिक सहसंचालक, साखर कोल्हापूर यांच्याकडून स्वयंस्पष्ट अहवाल मागविण्यात आला आहे. साखर आयुक्तालय कार्यालयातील साखर संचालक अर्थ यांनी हा अहवाल मागविला आहे.
आमदार प्रकाश आबिटकर यांनी आजरा साखर कारखान्याच्या थकित कर्जाच्या पुनर्गठनाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बैठकीची मागणी केली होती. त्यावेळी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत बैठक झाली. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही याप्रकरणी जबाबदारी टाकण्यात आली आहे.
आबिटकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या दिलेल्या पत्राची दखल घेत कोल्हापूर विभागाच्या प्रादेशिक सहसंचालक साखर यांच्याकडे या अहवालाची मागणी केली आहे. आवश्यक कागदपत्रांसह स्वयंस्पष्ट, वस्तुस्थितीदर्शक व अचूक कारवाईसूचक अभिप्रायात्मक अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.