आजरा नगरपंचायतीची गेल्या आर्थिक वर्षात मालमत्ता कर व पाणीपट्टी कराची ७२ टक्के वसुली झाली आहे. नगरपंचायत कर विभागाने १ कोटी २३ लाख ८५ हजारांची मागणी केली होती. त्यापैकी ८९ लाख २४ हजारांची वसुली झाली आहे, अशी माहिती मुख्याधिकारी अजिंक्य पाटील व करअधिकारी विजय मुळीक यांनी दिली.
नगरपंचायत स्थापनेपासून आजरा शहरातील शासकीय कार्यालयांना मालमत्ता कराची आकारणी केली आहे. शासकीय कार्यालयांनी वरिष्ठ कार्यालयाकडे निधीची मागणी केली आहे; पण अद्यापही करवसुली झालेली नाही. तर नगरपंचायत कार्यक्षेत्रात असलेल्या मालमत्तेवरही कर आकारणीची मागणी केली आहे; मात्र अद्यापही या परिसरात नगरपंचायतीकडून अद्यापही भौतिक सुविधा १०० टक्के दिलेल्या नाहीत. त्यामुळे करवसुलीत अडथळे आले आहेत. तर अनेक नागरिकांची मालमत्ता आजऱ्यात आहे; पण ते मुंबई, पुणेसह अन्य शहरात राहतात. त्यामुळे अशा लोकांकडूनही करवसुली झालेली नाही. करवसुलीसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.
आजरा शहरातील नागरिकांनी करवसुलीत चांगले सहकार्य केले आहे. नागरिकांनाही जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देण्याचा नगरपंचायतीचा प्रयत्न आहे. सध्या शहरातील गटर्स बांधकाम सुरू आहे. त्यापाठोपाठ पाणी योजनेचे पाइपलाइनचे काम व रस्त्याचे काम केले जाणार आहे. सध्या आजऱ्यात स्वच्छ व सुंदर आजरासाठी स्वच्छता अभियान राबविले जात आहे. नागरिकांनी ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे कचरा गाडीत द्यावा व आजरा शहर व स्वच्छ व सुंदर राहणेसाठी प्रयत्न करावेत, असेही आवाहन मुख्याधिकारी अजिंक्य पाटील यांनी केले आहे.