उत्तूर : ओळखीतून झालेले प्रेमसंबंध आणि लग्न करण्याचे आश्वासन देऊन वारंवार पैसे उकळून लग्नास नकार देणाऱ्या प्रियकराचा गळा आवळून खून केला. त्यानंतर प्रवासी ट्रॅव्हल्स बॅगेत मृतदेह भरून मुमेवाडीनजीक (ता. आजरा) निर्जणस्थळी आणून तो मृतदेह नष्ट करण्याचा संशयितांचा डाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे अपयशी ठरला. या घटनेमुळे परिसरासह जिल्ह्यात खळबळ उडाली असून याप्रकरणी सुनीता सुभाष देवकाई (रा. खोपोली, ता. खालापूर, जि. रायगड) हिला पोलिसांनी रात्री पकडून ताब्यात घेतले. गजेंद्र सुभाष पांडे (वय ३८, रा. जिंतूर, जि. परभणी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. बुधवारी (२७) रात्री झालेल्या या खुनाचा उलगडा गुरुवारी (दि. २८) रोजी रात्री झाला.पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, गजेंद्र पांडे व सुनीता देवकाई यांचे दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. गजेंद्र याने लग्न करण्याचे आश्वासन देऊन सुनीता यांच्याकडून वारंवार पैसे उसने घेतले होते. लग्नही केले नाही व पैसेही परत दिले नाहीत या रागापोटी बुधवार (२७) रात्री साडेअकरा वाजता खोपोली येथे गजेंद्र पांडे यांना झोपेच्या गोळ्या देण्यात आल्या.रात्री साडेअकरा वाजता सुनीता व अमित पोटे (रा. सुळे, ता. आजरा) यांनी खोपोलीमध्येच गजेंद्रचा गळा आवळून खून केला. एका मोठ्या ट्रॅव्हलर बॅगेमध्ये गजेंद्र यांचा मृतदेह भरून चारचाकी गाडीने कागल येथे आले. कागल येथील पेट्रोल पंपावर चार बाटल्या पेट्रोल घेतले. वाटेतील शेतातून हरभऱ्याचा कोंडा बेडशीटमध्ये बांधून घेतला. मुमेवाडीजवळील वळणावर गाडी थांबवून गाडीतील मृतदेहाची बॅग, कोंडा व पेट्रोलच्या बाटल्या डोंगरातील झुडपाजवळ नेवून ठेवल्या.दरम्यान, या परिसरात हवालदार बाजीराव कांबळे व कॉन्स्टेबल राजेंद्र पाटील पोलिस गाडीतून रात्रीची गस्त घालत असताना त्यांना रस्त्यावर चारचाकी उभी असल्याचे दिसून आले. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्यांना झुडपाजवळ एक महिला, मृतदेह भरलेली ट्रॅव्हल बॅग आणि पेट्रोलने भरलेल्या चार बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून महिलेला ताब्यात घेतले आहे.याबाबत पोलिसांनी सुनीता देवकाई, सूरज सुभाष देवकाई (रा. खोपोली), अमित पोटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक नागेश यमगर, उपनिरीक्षक संजय पाटील, हवालदार बाजीराव कांबळे, कॉन्स्टेबल राजेंद्र पाटील करीत आहेत.
प्रवासी बॅगेतून मृतदेह आणलामयत गजेंद्र पांडे चार दिवसांपूर्वी (२४) परभणीतून खोपोलीत आला होता. दोन दिवसांपूर्वी (२७) खोपोलीत त्याचा खून झाला. काल (२८) त्याचा मृतदेह मुमेवाडी घाटात बॅगेत आढळून आला.
हवालदार बाजीराव कांबळे यांची सतर्कतामुमेवाडी घाटात काल रात्री चारचाकी थांबलेली हवालदार बाजीराव कांबळे यांना दिसून आली. त्यांनी चालकाकडे विचारणा केली असता फॅमिली लघुशंकेसाठी गेली आहे, असे सांगितले. त्यावर विश्वास न ठेवता हवालदार कांबळे यांनी सखोल चौकशी केली व खुनाचा उलगडा झाला.