कृष्णा सावंत / पेरणोली
आजरा तालुक्यातील १० शाखांचा कारभार हाकणाऱ्या आजरा पोस्ट मास्तराची जागा रिक्त आहे. तीन वर्षापासून पोष्ट मास्तराअभावी कारभार सुरू असल्याने ग्राहकांना गैरसोयीला तोंड द्यावे लागत आहे.
शासनाच्या विविध योजनांमुळे व ऑनलाइन सुविधेमुळे पोस्ट कार्यालयाचे कामकाज वाढले आहे. ग्रामीण भागातही कामकाजाचा विस्तार वाढला आहे. पोस्ट कार्यालयाच्या व्यवहारात मोठी वाढ होत आहे.
मात्र, कामकाजाचे नियोजन करण्यासाठी प्रमुख पद असलेले आजरा कार्यालयात पोस्ट मास्तरची जागा रिक्त असल्याने उर्वरित कर्मचाऱ्यांवर ताण येत आहे.
पेरणोली, सोहाळे, गवसे, भादवण, मडिलगे, ईटे, किटवडे, एरंडोळ, हत्तीवडे, कासारकांडगाव या गावांत शाखा आहेत. आजरा शहरात या शाखांचे प्रमुख कार्यालय आहे.
प्रमुख कार्यालयात तीन लिपिक, चार शिपाई आहेत. कामकाज वाढत असल्याने लिपिकांवर ताण येत आहे. वाढत्या कामामुळे रात्री उशिरा घरी जावे लागत आहे. याचा कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे, तर ग्राहकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे पोस्ट मास्तराची जागा त्वरित भरण्याची मागणी होत आहे.
------------------------
* टेबलावरती औषध -गोळ्या
पोस्ट मास्तराचा चार्ज आणि जादा कामामुळे कर्मचाऱ्यांचे आरोग्य बिघडत आहे. त्यामुळे आजरा येथील कार्यालयात टेबलावर औषध व गोळ्या ठेवूनच कर्मचारी कामकाज करत आहेत.