कोल्हापूर : गेली दोन वर्षे बंद असलेला गवसे (ता. आजरा) येथील आजरा शेतकरी साखर कारखाना सुरू होण्याचा मार्ग सोमवारी मोकळा झाला. जिल्हा बँकेचे तब्बल ६९ कोटी रुपयांचे कर्ज सामूहिक प्रयत्नातून भरण्यात आले. त्यामुळे नव्या कर्जासाठी कारखाना पात्र ठरला आहे. ‘लोकमत’ने हा कारखाना सुरू झाला पाहिजे, अशी भूमिका घेऊन गेल्या महिन्यात पाच भागांची वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती.
उसाचे कमी झालेले गाळप, साखर दरातील अनिश्चितता, कर्जाचे व्याज या सगळ्यातून आजरा साखर कारखाना गेली दोन वर्षे अडचणीत येऊन बंद पडला होता. सहकारी तत्त्वावरून अडचणीत येऊन खासगी समूहाकडे चालवण्यासाठी दिलेला राज्यातील पहिला कारखाना अशी नोंद झालेला हा कारखाना पुन्हा एकदा कोणाला तरी चालवायला द्यावा लागणार अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतलेली महत्त्वपूर्ण भूमिका आणि त्यांना अन्य मान्यवरांनी केलेले सहकार्य, कारखान्याचे अध्यक्ष सुनील शिंत्रे आणि त्यांच्या सर्व सहकारी संचालकांनी सातत्याने यश-अपयशाचा विचार न करता केलेले प्रयत्न, यासाठी मुंबईपर्यंत मारलेल्या फेऱ्या सार्थकी लागल्या.
तब्बल ६९ कोटी रुपये भरल्याशिवाय कारखान्याला नवे कर्ज देता येणार नव्हते आणि नवीन कर्ज दिल्याशिवाय कारखाना सुरूच होऊ शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये काही दिवसांसाठी का असेना इतकी रक्कम कशी गोळा करायची, असा मोठा प्रश्न होता. परंतु मंत्री मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासह विविध सहकारी संस्था यांनी केलेल्या सहकार्यामुळे सोमवारी अखेर ६९ कोटी रुपये जिल्हा बँकेत भरण्यात आले.
अध्यक्ष सुनील शिंत्रे, संचालक आणि जिल्हा बँकेचे संचालक अशोक चराटी, संचालक सुधीर देसाई, अनिल फडके, कार्यकारी संचालक प्रकाश चव्हाण, रमेश वांगणेकर यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली. येत्या काही दिवसांत रीतसर जिल्हा बँक नव्याने आजरा कारखान्यासाठी कर्जपुरवठा करणार आहे. त्यामुळे येणारा गळीत हंगाम सुरू होणार आहे.
चौकट
पवार ते ठाकरे
आजरा कारखाना सहकारी तत्त्वावर चालू रहावा यासाठी संचालक मंडळाने जोरदार प्रयत्न केले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यापासून ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदे, उदय सामंत यांच्यासोबत कोल्हापूर, मुंबई येेथे अनेक बैठका झाल्या. सर्व बैठकांमधून जिल्हा बँकेचे अध्यक्ष असलेल्या हसन मुश्रीफ यांना याप्रश्नी मार्ग काढावा, अशी त्यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आली. त्यानुसार मुश्रीफ यांनी सोमवारी त्यांच्याकडून हा विषय संपवला.