आजरा : आजरा साखर कारखान्याचे संचालक व कामगारांनी हातात हात घालून पारदर्शीपणाने काम केल्यास हा कारखाना सहकार वाचविण्याचा राज्यातील आदर्श पॅटर्न ठरेल, असे शाहू साखर कारखान्याचे माजी व्यवस्थापकीय संचालक विजय औताडे यांनी रविवारी येथे सांगितले.
हा कारखाना कसा उत्तम पध्दतीने चालवता येईल, यासंबंधीचे मार्गदर्शन करण्यासाठी औताडे यांनी संचालक, कामगार व विविध विभागप्रमुखांशी संवाद साधला. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष सुनील शिंत्रे होते. यावेळी सातारा येथील अजिंक्यतारा कारखान्याचे कार्यकारी संचालक संजीव देसाई उपस्थित होते.
औताडे म्हणाले, कारखाना काटकसरीने चालवून उर्जितावस्थेत आणण्यासाठी कर्मचाऱ्यांनी पुढील तीन वर्ष पन्नास टक्के पगारावर काम करण्याची लेखी हमी संचालक मंडळाला दिली, हे मोठे योगदान आहे. बचत हेच उत्पन्न असून, तुम्ही कारखान्यात वाचवायला शिका. कामाची एकमेकांवर ढकलाढकल न करता समन्वयाने काम करा, तरच तुमच्या त्यागाचे चीज होईल. साखर धंद्याची सध्याची स्थिती फारच बिकट असून, सहकार टिकवण्यासाठी संचालकांनी साधेपणाने कामकाज करण्याची गरज आहे. खरेदी-विक्री अत्यंत पारदर्शक ठेवा, एफआरपीच्या तुलनेत साखरेच्या किमान विक्री दरात वाढ न झाल्याने कारखान्यांच्या तोट्यात सतत वाढ होत असून, कारखाने आर्थिक डबघाईला येत आहेत. म्हणून अधिक जबाबदारीने काम करण्याची गरज आहे.
संजीव देसाई यांनीही कारखान्याच्या कामगारांचे कौतुक केले. ज्येष्ठ संचालक विष्णुपंत केसरकर यांनी स्वागत केले. औताडे यांचा सत्कार ज्येष्ठ संचालक वसंतराव धुरे यांच्या हस्ते तर संजीव देसाई यांचा सत्कार अध्यक्ष शिंत्रे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष आनंदराव कुलकर्णी, संचालक अशोक चराटी, मुकुंदराव देसाई, दिगंबर देसाई, संचालिका अंजना रेडेकर, सुधीर देसाई, एम. के. देसाई, मारुती घोरपडे, मलिककुमार बुरूड, दशरथ अमृते, जितेंद्र टोपले, राजेंद्र सावंत, अनिल फडके, लक्ष्मण गुडुळकर, संचालिका सुनीता रेडेकर, विजयालक्ष्मी देसाई, संचालक आनंदा गवळी, तानाजी देसाई, विलास नाईक, प्रभारी कार्यकारी संचालक प्रकाश चव्हाण, कामगार युनियन सदस्य, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
०५०७२०२१-कोल-आजरा सत्कार
आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्यातर्फे ज्येष्ठ साखर उद्योग तज्ज्ञ विजय औताडे यांचा कारखान्याच्यावतीने रविवारी वसंतराव धुरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष सुनील शिंत्रे, आनंदराव कुलकर्णी, अंजना रेडेकर, आदी मान्यवर उपस्थित होते.