आजरा : आजरा साखर कारखाना जिल्हा बँकेच्या ताब्यातून सहकारात परत आलेला पहिला कारखाना आहे. त्यामुळे आजरा साखर कारखान्याचा सहकार वाचविण्याचा हा आदर्श पॅटर्न ठरेल, असे गौरवोद्गार शाहू साखर कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक विजय औताडे यांनी केले. ते आजरा साखर कारखाना कार्यस्थळावर संचालक मंडळ, कामगार युनियन व विभाग प्रमुखांच्या बैठकीत बोलत होते.
अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे होते. कारखाना पुढे काटकसरीने चालवून ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी कर्मचाऱ्यांनी पुढील तीन वर्षे पन्नास टक्के पगारावर काम करण्याची लेखी हमी संचालक मंडळाला दिली.
यावेळी अजिंक्यतारा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनीही कारखान्याच्या कामगारांचे कौतुक केले व कामगार आणि संचालक मंडळास मौलिक मार्गदर्शन केले. संचालक विष्णुपंत केसरकर यांनी स्वागत केले. विजयराव औताडे यांचा सत्कार ज्येष्ठ संचालक वसंतराव धुरे यांच्या हस्ते, तर संजीव देसाई यांचा सत्कार अध्यक्ष सुनील शिंत्रे यांच्या हस्ते झाला.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष आनंदराव कुलकर्णी, संचालक अशोक चराटी, मुकुंदराव देसाई, दिगंबर देसाई, संचालिका अंजना रेडेकर, सुधीर देसाई, एम. के. देसाई, मारुती घोरपडे, मलिककुमार बुरूड, दशरथ अमृते, जितेंद्र टोपले, राजेंद्र सावंत, अनिल फडके, लक्ष्मण गुडूळकर, संचालिका सुनीता रेडेकर, विजयालक्ष्मी देसाई, संचालक आनंदा कांबळे, तानाजी देसाई, विलास नाईक, प्र. कार्यकारी संचालक प्रकाश चव्हाण, कामगार युनियन सदस्य, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
फोटो ओळी : आजरा साखर कारखान्यावर ‘शाहू’चे माजी कार्यकारी संचालक विजय औताडे यांचा सत्कार करताना वसंतराव धुरे. शेजारी अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे, उपाध्यक्ष आनंदराव कुलकर्णी यांच्यासह संचालक उपस्थित होते.
क्रमांक : ०५०७२०२१-गड-०१