सकाळी ९ ते ११ या काळात अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी प्रत्येकी एकच अर्ज प्राप्त झाल्याने या निवडी बिनविरोध करण्यात आल्या. कोगनोळी ग्रामपंचायतीमध्ये कॉंग्रेसप्रणित ग्रामविकास आघाडीने ३२ जागांपैकी एका बिनविरोध जागेसह २५ जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्षपदेही याच आघाडीकडे राहणार हे निश्चित होते. उपाध्यक्षपदासाठी आरक्षित झालेल्या ओबीसी ‘ब’ या प्रवर्गाचा एकच उमेदवार असल्याने तुकाराम शिंदे यांचीच निवड होणार हे निश्चित होते. अध्यक्षपदासाठी आरक्षित झालेल्या सामान्य महिला या प्रवर्गाचे सहा उमेदवार होते. यातील दोन उमेदवारांना अध्यक्षपदी मागील कार्यकाळात संधी दिल्याने सुकाणू समितीने उर्वरित चार उमेदवारांना या कार्यकाळासाठी पात्र ठरविले. या चार उमेदवारांमधून चिठ्ठी काढून आक्काताई खोत यांची पहिल्या सव्वा वर्षांकरीता अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील, माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, माजी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब कागले, माजी ग्रामपंचायत सदस्य मारुती कोळेकर, ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी डी. बी. जाधव, सेक्रेटरी परशुराम चावर यांच्यासह सर्व कर्मचारी वर्ग तसेच सर्व नूतन सदस्य उपस्थित होते.
चौकट
ग्रामविकास आघाडीमधून एकही मुस्लिम उमेदवार विजयी न झाल्याने त्या समाजातील ज्येष्ठ व्यक्तीच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली.