नसिम सनदी-आदित्य वेल्हाळकुरुंदवाड : माजी खासदार राजू शेट्टी यांनी काढलेल्या पूरग्रस्त आक्रोश मोर्चात रविवारी सायंकाळी एकाने नृसिंहवाडी येथील पंचगंगा पुलावरून उडी घेतली. जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे पुलावर बंदोबस्त पाहणीसाठी आले होते. त्यांच्या समोरच उडी घेतल्याने एकच गोंधळ उडाला. त्याला बचाव पथकानं तात्काळ बाहेर काढल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान हा उडी मारणारा कोण याची स्वाभिमानाच्या कोणत्याच नेत्याला माहित नव्हती. शेट्टी यांचा आदेश येईपर्यंत कोणीही कोणती पावलं उचलू नये असे पुकारण्याची वेळ नेत्यांवर आली. त्यानंतर आणखी एका व्यक्तीनं पुलावरून उडी घेतली. परंतु बचाव पथकाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला.
पुराचा लोंढा दिसावा तसा लोकांचा पूर यात्रेच्या मार्गावर दिसत होता. नृसिहवाडी जवळ येईल तशी गर्दी वाढत होती. कुरुंदवाडमध्ये तर रस्ते तुडुंब भरून वाहत होते. शेतकरी वाचलाच पाहिजे, राजू शेट्टींना बळ दिलेच पाहिजे अशा घोषणा त्या ठिकाणी केल्या जात होत्या.
प्रचंड जल्लोष...एकसारखी वाजणारी हलगी, डफ आणि टाळ, घुमणारे ढोल, फुटणाऱ्या फटाक्याच्या माळा आणि दिल्या जाणाऱ्या घोषणा आणि स्वागतासाठी उधळली जाणारी फुले, पायावर घातले जाणारे पाणी असे वातावरण पाहता आक्रोश कमी आणि जल्लोष जास्त दिसत होता. अक्षरशः फटाके लावून संगीताच्या तालावर लोक थिरकत होते. वाजणाऱ्या शिट्या आणि लोक तर हार बुके घेऊन स्वागत करताना दिसत होती.