कोल्हापूर : महापूरग्रस्तांना भरीव नुकसानभरपाई मिळावी, नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना त्वरित ५० हजारांचे अनुदान द्यावे, आदी मागणीसंबंधी सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे पंचगंगा काठावरून भव्य पदयात्रा काढून जलसमाधी घेण्याच्या आंदोलनाची तयारी केली जात आहे. ‘आक्रोश पूरग्रस्तांचा, परिक्रमा पंचगंगेची’ या नावाने पदयात्रा १ सप्टेंबरला सुरुवात होईल. गेल्या महिन्यात आलेल्या महापुरामुळे शेती आणि इतर मालमत्तांचे प्रचंड नुकसान झाले आहे; पण भरपाई अतिशय तुटपुंजी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हा निर्णय बदलून भरीव नुकसान भरपाई देण्याची मागणी स्वाभिमानीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी आक्रोश मोर्चा काढून केली आहे. या मोर्चाची दखल घेऊन सरकारने सकारात्मक निर्णय न घेतल्यास पदयात्रा काढून स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांसह माजी खासदार राजू शेट्टी नृसिंहवाडी येथे जलसमाधी घेणार आहेत. त्याची घोषणाही शेट्टी यांनी केली आहे. सरकार मदतीचा निर्णय बदलासंबंधी हालचाल करीत नसल्याचे लक्षात येताच जलसमाधी आंदोलनाची तयारी संघटनेतर्फे केली जात आहे.
महापुराने सर्वाधिक नुकसान होणाऱ्या आणि दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या प्रयाग चिखलीपासून पदयात्रा निघेल. तेथून पदयात्रा आंबेवाडी, वडणगे, निगवे, भुये, शिये, शिरोली, हालोंडी, हेर्ले, चोकाक, रूकडी, चिंचवाड, मुडशिंगी, वसगडे, पट्टणकोडोली, इंगळी, रुई, चंदूर, इचलकरंजी, शिरदवाड, अब्दुललाट, हेरवाड, तेरवाड, कुरुंदवाड या मार्गे पदयात्रा ५ किंवा ६ सप्टेंबरला नृसिंहवाडीत पोहोचेल. तेथे पदाधिकारी व माजी खासदार शेट्टी सामुदायिक जलसमाधी आंदोलन करतील.
कोट
स्वाभिमानीने महापूरग्रस्त आणि नियमित पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसंबंधी केलेल्या मागण्यांसंबंधी सरकारने सकारात्मक पावले न उचलल्यास पंचगंगा नदीचा उगम झालेल्या प्रयाग चिखलीपासून १ सप्टेंबरला पदयात्रेला सुरुवात होईल. पदयात्रा पंचगंगा काठावरून येत ५ किंवा ६ सप्टेंबरला नृसिंहवाडीत माझ्यासह पदाधिकारी सामुदायिक जलसमाधी घेतील. त्याची तयारी सुरू केली आहे.
- राजू शेट्टी, माजी खासदार