-समीर देशपांडे
‘अक्षर दालन’ आणि ‘निर्धार’ यांच्या वतीने गेली ११ वर्षे ‘अक्षरगप्पा’ या उपक्रमाचे आयोजन केले जाते. या उपक्रमाचा शतकमहोत्सवी कार्यक्रम आज, सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता राम गणेश गडकरी हॉल (पेटाळा) येथे आयोजित करण्यात आला आहे.
प्रत्येक महिन्याचा चौथा रविवार. सायंकाळी पाचची वेळ. एक-एक रसिकश्रोते जमा होऊ लागतात. सव्वापाचला कार्यक्रम सुरू होतो. पाचच मिनिटांचे औपचारिक स्वागत, प्रास्ताविक, वक्त्यांचा परिचय होतो आणि थेट वक्ता बोलू लागतो. तास, सव्वातासात कार्यक्रम संपतो. वेगळ्या विषयावर काही नवीन ऐकल्याचं समाधान घेऊन रसिक चहापानानंतर घरी परततात.गेली ११ वर्षे कोळेकर तिकटीवरील ‘अक्षर दालन’मध्ये अनेक रसिकश्रोते या मासिक दृश्याचे साक्षीदार आहेत. रवींद्र जोशी यांच्या ‘अक्षर दालन’ या ग्रंथभांडाराचे उद्घाटन झाले आणि त्यावेळी हे ऐसपैस दालन पाहून ‘निर्धार’चे समीर देशपांडे यांनी त्यांना दर महिन्याला असा एखादा कार्यक्रम घेता येईल का, अशी विचारणा केली. कुणालाही ‘नाही’ म्हणण्याची सवय नसलेल्या जोशी यांनी ही कल्पना उचलून धरली.पहिल्याच कार्यक्रमासाठी जाजम घातले गेले. कुणी आपले अनुभव सांगितले. कुणी कविता म्हटल्या आणि ‘अक्षरगप्पां’ना सुरुवात झाली. संयोजकांनी सुरुवातीपासूनच विषयाचे आणि क्षेत्राचे कोणतेही बंधन घालून न घेतल्याने हा उपक्रम लोकप्रिय होऊ लागला.माजी तुरुंग अधिकारी टी. डी. कुलकर्णी यांच्यापासून ते कामगार नेते भाई जगताप यांच्यापर्यंत आणि व्यसनमुक्तीवाल्या अनिल अवचट यांच्यापासून ते ख्यातनाम गायक महेश काळे यांच्यापर्यंत विविध क्षेत्रांतील मान्यवरांपासून सर्वसामान्यांनीही या कट्ट्यावर हजेरी लावल्याने श्रोत्यांना विविध विषयांतील चौफेर अनुभव घेता येऊ लागले. रौप्यमहोत्सवी कार्यक्रमासाठी प्रसिद्ध कन्नड साहित्यिक भैराप्पा उपस्थित राहिले. ‘लवासा’वर आरोप-प्रत्यारोप सुरू असताना पत्रकार निळू दामले यांनी सुवर्णमहोत्सवानिमित्त आपली भूमिका मांडली.
अमृत महोत्सवासाठी आदिवासी पाड्यावर काम करणाऱ्या डॉ. स्मिता कोल्हे आल्या आणि आता शतकमहोत्सवी कार्यक्रमासाठी ‘लाभले आम्हांस भाग्य, बोलतो मराठी’ हे सुरेश भटांचे मराठी अभिमानगीत मराठी घराघरांत पोहोचविणाऱ्या कौशल इनामदार यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनीही या गप्पा रंगविल्या आहेत.कॉ. गोविंद पानसरे, विक्रमसिंह घाटगे, जगदीश खेबूडकर, चंद्रकांत पाटगावकर, उदयसिंगराव गायकवाड, नूतन गंधर्व आप्पासाहेब देशपांडे या दिवंगतांनीही या गप्पांच्या माध्यमातून रसिकांशी संवाद साधला होता; तर खासदार राजू शेट्टी, हिंदकेसरी दीनानाथसिंह, लक्ष्मी धौल, सुनीलकुमार लवटे, दिग्दर्शक चंद्रकांत जोशी, अभिनेते सुबोध भावे, हृषिकेश जोशी, नितीन कुलकर्णी यासारख्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आपला सहभाग नोंदविला आहे. आता या कार्यक्रमाची शताब्दी साजरी होत असताना या ‘अक्षरगप्पा’अशाच रसिकसेवेत रुजू राहाव्यात, यासाठी शुभेच्छा.