कोल्हापूर : कोरोनासारख्या महामारीतून गतवर्षी बाहेर पडताना कोल्हापूरकरांच्या तसेच जिल्हा प्रशासनाच्या नाकी दम आला होता. परंतु आता त्याचीच पुनरावृत्ती होते की काय अशी शंका येण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या चोवीस तासात ४७ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाल्याने परिस्थिती गंभीर वळण घेत असल्याचे मंगळवारी दिसून आले. नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे रुग्ण संख्या वाढत आहे. या ४७ नवीन रुग्णांपैकी ३२ रुग्ण हे कोल्हापूर शहरातील आहेत.
कोल्हापूर शहरात गर्दीवर नियंत्रण नसल्याने तसेच नागरिक सुध्दा शारीरिक अंतर ठेवण्याच्या बाबतीत दुर्लक्ष करत असल्यामुळे दि. १ फेब्रुवारी ते दि. २३ फेब्रुवारी अखेर १०५ कोरोना रुग्णांची भर पडली आहे. अवघ्या तेवीस दिवसातील ही रुग्णवाढ गंभीर आहे. मार्च २०२० ते नोव्हेंबर २०२० या काळात तर कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून कोल्हापूर शहराकडे पाहिले जात होते. त्यामुळे आताही रुग्ण वाढत असताना त्यात कोल्हापूर शहरातील रुग्ण जास्त असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होऊ लागले आहे. शहरवासीयांचा निष्काळजीपणा नव्या संकटाला आमंत्रण देणारा ठरत आहे.
मंगळवारी सीपीआर रुग्णालयाने प्रसिध्द केलेल्या पत्रकात जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत ४७ नवीन रुग्ण आढळून आले तर एकाचा मृत्यू झाला. रामानंदनगर जवळील दत्तात्रय कॉलनीतील ६५ वर्षीय महिलेचा सीपीआर रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झाला. गेल्या दोन महिन्यांत हा सर्वाधिक आकडा असून तो चिंता करायला लावणार आहे. चोवीस तासांत १३९ आरटीपीसीआर, ११२ ॲन्टीजेन तर खासगी लॅबमधून २०१ कोरोना चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले.
शहराबरोबरच आजरा, गडहिंग्लज, कागल, करवीर, पन्हाळा तालुक्यात प्रत्येकी एक, हातकणंगले तालुक्यात दोन, नगरपालिका हद्दीत तीन तर इतर जिल्ह्यातील पाच रुग्णांचा बाधितांमध्ये समावेश आहे. गेल्या काही दिवसापासून ग्रामीण भागात रुग्ण आढळून येत नव्हते, पण मंगळवारी एक, दोन रुग्ण आढळून आले आहेत.
पाईंटर -
- २८ डिसेंबर ते २१ फेब्रुवारी दरम्यान आठ आठवड्यात ७७५ नवीन रुग्णांची नोंद.
- दि. २३ फेब्रुवारीपर्यंत एकूण रुग्ण - ५० हजार २५३
- कोरोनामुक्त झालेले रुग्णांची संख्या - ४८ हजार ३४०
- आतापर्यंत कोरोनाचे बळी - १७३८
-मृ्त्यूचा दर - ३.५
- रुग्ण बरे होण्याचे प्रमाण - ९६.२२ टक्के.
- कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग प्रमाण - १०.३० टक्के
- एकूण चाचण्या - ३ लाख ४८ हजार १३०