बाबासाहेब कदम ।लोकमत न्यूज नेटवर्कवारणा कापशी : जिद्दीला प्रयत्नांचे पंख लाभले तर पाऊलवाटांचा राजमार्ग बनायला वेळ लागत नाही. याचे उदाहरण म्हणजे आळतूर (ता. शाहूवाडी) येथील विद्यामंदिरातील शैक्षणिक उठावाचे काम. शाळेच्या मुख्याध्यापकांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला सहकाऱ्यांच्या मदतीने ई-लर्निंगच्या पूर्ततेचा विडा उचलला आणि बघता...बघता लोकसहभागातून पाच लाख रुपयांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.आळतूर हे रत्नागिरी महामार्गापासून केवळ चार कि.मी. अंतरावरील जेमतेम अडीच हजार लोकवस्तीच गाव. विज्ञान आणि तंत्रज्ञानापासून कित्येक मैल दूर असणारे दुर्गम गाव; परंतु या गावातील प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक महादेव कुंभार व त्यांच्या सहकाºयांनी शाळेचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला आणि कामाला सुरुवात केली. लोकवर्गणीच्या माध्यमातून पाच लाख रुपयांचे शैक्षणिक उठावाचे काम पूर्ण करण्याचा निर्धार केला. त्यातील नव्वद टक्के उद्दिष्ट साध्यदेखील झाले आहे. इंग्रजी, गणित विषयांच्या गुणवत्ता वाढीसाठी वेगवेगळे उपक्रम चालू आहेत. इंग्रजी विषयासाठी सुमारे वीस हजार फ्लॅश कार्ड वापरून गुणवत्ता वाढ केली आहे. लोकसहभागातून सत्तर हजार रुपयांच्या झोळी ग्रंथालयाची निर्मिती केली आहे. गावच्या संलग्न पाच वाड्यांतील तीस ते साठ वर्षे वयोगटातील शंभर वाचक वाचनाचे वेड जिल्ह्यातील आगळ्यावेगळ्या झोळी ग्रंथालयाच्या माध्यमातून जपत आहेत. विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र ग्रंथालयाची सोय आहे. पस्तीस हजार रुपयांची आधुनिक ध्वनियंत्रणा योजना अस्तित्वात आहे. पाच वर्गात प्रत्येकी पंचवीस हजार रुपयांचे एल.ई.डी. संच सॉफ्टवेअर यंत्रणेसह सज्ज आहेत. तीन संगणकांच्या माध्यमातून स्वतंत्र प्रयोगशाळेची निर्मिती केली आहे. अद्ययावत स्वच्छतागृह, स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन केंद्र कार्यान्वित असणारी तालुक्यातील दुर्गम भागातील ही एकमेव शाळा आहे. सुमारे पंचवीस विद्यार्थी या मार्गदर्शन केंद्राचा लाभ उठवत आहेत. शाळेच्या नव्वद फूट लांब भिंतीवर तीन फूट रुंदीचे पर्यावरण, स्वच्छता, नैसर्गिक आपत्ती, कन्या वाचवा मोहीम, वृक्षसंवर्धन, साक्षरता जागृतीच्या फलकांचे काम अंतिम टप्प्यात आहे. याशिवाय प्रोजेक्टर, वर्गसजावट, सुसज्ज कार्यालय यासारख्या माध्यमातून शाळेचा चेहरामोहरा बदलला आहे.शासनाकडे अथवा राजकीय व्यक्तीकडून कोणतीही अपेक्षा न बाळगता माजी विद्यार्थी, मुंबईतील चाकरमानी लोक, सामाजिक संस्था आणि शाळेवर जिवापाड प्रेम करणारे पालक या अभियानात खारीचा वाटा उचलत आहेत. सर्वांच्या सहकार्यातून आणि समन्वयातून शाळेने नवे रूप धारण केले आहे. भौतिक सुविधांबरोबर गुणवत्ता वाढीसाठी राबविलेले उपक्रम विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात नवी भर टाकत आहेत. पर्यायाने दुर्गम आणि डोंगरदºयातील मुले नवी आव्हाने पेलण्यासाठी सज्ज झाली आहेत. नववर्षाच्या पूर्वसंध्येला पंचाहत्तर टक्के शैक्षणिक उठावाचे उद्दिष्ट पूर्ण केलेली आळतूरची प्राथमिक शाळा गर्जनच्या (ता.करवीर) वाटेवरील शाळा म्हणून नावारूपास येत आहे.
शाहूवाडीतील आळतूर विद्यामंदिर स्वबळावर हायटेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 1:00 AM