कोल्हापूर : दारात मोबाईलवर क्रिकेट सामने बघत बसलेल्या दोघा भावांना दारूच्या नशेत चौघांनी दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्याचा प्रकार शिवाजी पेठेतील सरनाईक कॉलनीत घडला. याप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शनिवारी रात्री उशिरा घडला. यावेळी घरांवर दगडफेक करून काही वाहनांचेही नुकसान करण्यात आले. यावेळी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
गुन्हा नोंदविलेले संशयित असे, शुभम भोसले, सौरभ भोसले, सूरज वाघ, रोहित पाथरवट (सर्व, रा. शिवाजी पेठ).
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शनिवारी रात्री उशिरा संदीप बाळासाहेब जाधव, त्याचा भाऊ विनायक जाधव, शेजारील अवधूत पोवार, सिद्धेश जरग, चंद्रकांत शिंदे हे सर्वजण संदीपच्या दारात मोबाईलवर आयपीएलचे क्रिकेट सामने पाहत बसले होते. त्यावेळी शुभम भोसले, सौरभ भोसले, सूरज वाघे, रोहित पाथरवट हे तेथे आले. त्यांनी दारूच्या नशेत विनायक जाधव यास शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी विनायकचा भाऊ संदीप जाधव हा वाद सोडवत असताना त्यालाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत डोक्यात दगड मारून जखमी केले. हा वाद सोडविण्यासाठी पुढे आलेल्यांच्या घरांवरही दगडफेक करण्यात आली. यावेळी रस्त्याकडेला उभ्या केलेल्या दुचाकींचीही नुकसान केल्याचे समजते. याप्रकरणी संदीप जाधव याने दिलेल्या तक्रारीनुसार रात्री उशिरा जुना राजवाडा पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा नोंद झाला.