लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : मतांसाठी पैशाचे वाटप नाही. दारू नाही की, मटणाच्या जेवणावळी. अशा सर्व गैरप्रकारांना फाटा देत यंदा सडोली खालसा (ता. करवीर) गावाने ग्रामपंचायत निवडणुकीत आदर्श पायंडा पाडला. आ. पी.एन. पाटील व माजी आ. संपतराव पवार यांचे हे गाव; परंतु या दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन गावाचे नाव बदनाम होऊ नये यासाठी चांगला पुढाकार घेतला. यावेळेच्या नाही; परंतु पुढील निवडणुकीत तरी अनेक गावांनी त्याचे अनुकरण केल्यास लोकशाही अधिक बळकट होईल.
सडोली हे अत्यंत सधन-संपन्न गाव. बुलडोझर व्यावसायिकांचे गाव म्हणूनही त्याची ख्याती. चांगली जमीन, कष्टकरी शेतकरी यामुळे चांगले पीक व त्यामुळे समृद्धीने नटलेले हे गाव. त्यात काँग्रेस व शे.का. पक्षाचे स्थानिक राजकारणात बळकट गट. गावची लोकसंख्या सुमारे साडेसहा हजार. पाच प्रभागांत १३ जागा निवडून द्यायच्या होत्या. त्यासाठी तीन पॅनलसह ४१ उमेदवार रिंगणात होते. अगोदरच काँग्रेस, शेकाप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न केले; परंतु जागा वाटपांत समझोता झाला नाही. त्यातही काँग्रेस व शेका पक्षाच्या कार्यकर्त्यांचे निवडणूक बिनविरोध करण्याचे अखेरपर्यंत प्रयत्न होते; परंतु यश आले नाही. त्यामुळे निवडणूक लागलीच आहे तर अन्य कोणत्याही गोष्टींना थारा द्यायचा नाही, असे प्रमुख कार्यकर्त्यांनी ठरविले. त्यास गावातील स्वाभिमानी जनतेनेही मोलाची साथ दिली. त्यामुळे एकूण निवडणुकीदरम्यान प्रचारातही गावात कुठेही तणाव नव्हता. कुणी कुणावरही दादागिरी, दहशत दाखविणे, असे प्रकार घडले नाहीत. एकही जेवणावळ उठली नाही किंवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी अन्य कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब झाला नाही. प्रचार करावा, ग्रामस्थांना आपली भूमिका पटवून द्यावी, त्यांनी मतदान करावे व जे निवडून येतील ते गावाचा कारभार पाहतील, असे सूत्र ठरल्याने यंदा गावची निवडणूक चांगल्या अर्थाने गाजली. पंचक्रोशीतूनही त्याबद्दल कौतुक झाले.