कोल्हापूर : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी ३१ डिसेंबरला चोवीस तास रस्त्यावर पोलीस बंदोबस्त व नाकाबंदी ठेवण्यात येणार आहे. रात्रीच्यावेळी संशयित मद्यपींची ब्रेथ ॲनालायझरने तपासणी करून त्यांची पुन्हा थेट शासकीय रुग़्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली.
अधीक्षक बलकवडे म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३१ डिसेंबर रोजी रात्री उशिरा रस्त्यावर जल्लोष करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची तपासणी होणार आहे. त्यासाठी पोलिसांचा चोवीस तास खडा पहारा असेल. नाकाबंदीत सर्व वाहनांची कसून तपासणी केली जाणार आहे. कोरोना काळात गुंडाळून ठेवलेले ब्रेथ ॲनालायझर मशीन पुन्हा मद्यपींची तपासणी करण्यासाठी बाहेर काढण्यात येणार आहे. संशयित मद्यपींची थेट सीपीआर रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून त्यांच्यावर कारवाई होणार आहे. रात्रीच्यावेळी ६० वर्षांवरील नागरिकांनी व लहान मुलांनी बाहेर पडू नये, असेही आवाहन अधीक्षक बलकवडे यांनी केले.
विशेष पथकांची करडी नजर
या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस मुख्यालयामार्फत विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. ३१ डिसेंबर रोजी नियमांचे उल्लंघन करण्यावर या पथकामार्फतही करडी नजर राहणार आहे. रात्रीच्यावेळी जुगार खेळणारे आढळल्यास त्या-त्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस अधिकारी व बीट अंमलदार यांना जबाबदार धरून त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे.
सीमावर्ती भागातील मद्य तस्करांवर रोख
जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून चोरट्या मार्गाने होणारी मद्याची तस्करी रोखण्यासाठी पोलिसांचे पॉईंट उभारण्यात येणार आहेत. त्यातून चोरटी वाहतूक रोखण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.