कोल्हापूर : गोकुळ दूध संघाने सहकार विभागाकडे पाठविलेले ३ हजार ६५९ सभासद हे क्रियाशीलच आहेत, असे विभागीय उपनिबंधकांनीच स्पष्ट केल्याने क्रियाशील-अक्रियाशीलचा मुद्दाच निकाली निघाला आहे. उपविधी दुरुस्तीचा अधिकार वापरून अक्रियाशील सभासदांना क्षमापित ठरावाद्वारे क्रियाशील करण्याची खेळी गोकुळमधील सत्ताधाऱ्यांनी खेळली आहे. याचे पडसाद आता उमटण्यास सुरुवात होणार आहे.सहकार कायद्यातील घटनादुरुस्तीनंतर नव्या नियमावलीनुसार सहकारी संस्थांच्या पुढील वर्षी निवडणुका होत असून, त्याची सुरुवात गोकुळपासून होत आहे. निवडणुकीस क्रियाशील मतदार पात्र ठरत असल्याने घटनेत तरतूद असल्याने त्यादृष्टीनेच सर्व ती खबरदारी घेतली जात आहे.
दरवर्षी ३० मार्चला अक्रियाशील सभासदांची यादी तयार करून ती त्या सभासदांना ३० एप्रिलच्या आत कळवायचे आहे. तथापि, गोकुळने अशाप्रकारे कधीही कळविलेले नाही. सहकार विभागातील नोंदीसाठी २५ संस्था अक्रियाशील सभासद आहेत; पण नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत क्षमापित या उपविधीतील तरतुदीचा आधार घेऊन गोकुळमधील सत्ताधाऱ्यांनी यादेखील सभासदांना क्रियाशील करून घेतले आहे. त्यामुळे आता वाढीव ३९६ मतदारांसह ३६५९ मतदार सद्य:स्थितीत मतदानास पात्र ठरणार आहेत.
क्रियाशील सभासद कोणाला म्हणावेज्या संस्थांनी पाचपैकी किमान एका सर्वसाधारण सभेला हजेरी लावणे अथवा संघाच्या सेवेचा उपभोग घेतलेला असला पाहिजे. ३६५ दिवसांपैकी २४० दिवसांत प्रतिदिन किमान २४० लिटर दूध संघाला पुरवठा केलेला हवा. या दोनपैकी एका अटीची पूर्तता केली असल्यास तो क्रियाशील सभासद ठरतो. दोन्हीचीही पूर्तता नसली तरी देखील सभेला हजेरी नसतानाही क्षमापितचा अधिकार वापरून तो क्रियाशील ठरविण्याचा अधिकार विद्यमान संचालक मंडळाला आहे. ठरावधारक संस्थेतील सभासदांनाही हाच नियम लागू असून, त्यांना पाच वर्षांतील किमान १८0 दिवस अथवा २५० लिटर दूध पुरवठा अथवा पशूखाद्याचा लाभ घेतलेला असावा.दुबार ठराव आल्यास मताधिकार गोठणारमतदार संस्थांनी ठराव देताना पूर्वीप्रमाणे नेत्यांकडून न येता वैयक्तिक संस्थांकडून येणार आहेत. हिरव्या रंगाचा ठरावाचा कागद असणार आहे. त्याच कागदावर ठराव पाठवावयाचा आहे. एकाच संस्थेकडून दोन ठराव आल्यास दोन्ही ठराव बाद करून मताधिकार गोठविण्यासह बोगस ठराव समजून कारवाई करण्याचे अधिकारही विभागीय उपनिबंधकांना आहेत.