कोल्हापूर : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या विकासासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. सकाळी त्यांनी अंबाबाई देवीचे दर्शन घेतल्यानंतर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सदस्य, मंदिराचे व्यवस्थापक व श्रीपूजकांची अनौपचारिक भेट घेऊन चर्चा केली.मंत्री झाल्यानंतर पाटील दोनच दिवसांपूर्वी येथे आले. दोन दिवस त्यांच्या सत्कारासाठी कार्यकर्त्यांची रिघ लागली. आज सकाळी पुन्हा ते मुंबईला रवाना झाले. तत्पूर्वी त्यांनी पत्नी अंजली यांच्यासह जाऊन देवीचे दर्शन घेतले व त्यानंतर मंदिराची पाहणी केली. यावेळी केदार मुनीश्वर यांनी त्यांना मंदिराच्या विकासामध्ये लक्ष घालण्याची विनंती केली. त्यावर चंद्रकांतदादा पाटील यांनी मंदिराच्या विकासासाठी मंत्री म्हणून जे काही करावे लागेल ते सगळे करण्याची तयारी असल्याचे सांगितले. मंदिरासाठी शासनाकडून नेमकी काय स्वरुपाची मदत हवी आहे यासंबंधीची माहिती द्यावी. त्यानुसार आपण नक्की मदत करू, असे मंत्र्यांनी स्पष्ट केले. यावेळी देवस्थान समितीच्या सदस्या संगीता खाडे, व्यवस्थापक धनाजी जाधव, अजित ठाणेकर, भाजपचे शहराध्यक्ष महेश जाधव आदींसह मान्यवर उपस्थित होते.मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मंगळवारी सकाळी अंबाबाई मंदिरात देवीचे सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी महेश जाधव, अंजली पाटील, अजित ठाणेकर, संगीता खाडे, आदी उपस्थित होते.
अंबाबाई मंदिराच्या विकासासाठी सर्व सहकार्य
By admin | Published: November 05, 2014 12:42 AM