कोल्हापूर : महापुरामुळे पुणे-बंगलोर महामार्ग बंद राहिल्याने कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात गॅस टंचाई भासली. गॅस सिलिंडरसाठी सोमवारी दिवसभर शहरामध्ये ग्राहकांच्या रांगा लागल्या. वितरकांच्या वतीने विविध ठिकाणी वितरण करण्यात आले. सिलिंडर मिळाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.महापुरामुळे पुणे-बंगलोर महामार्ग बंद राहिल्याने कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात गॅस टंचाई भासली. गेल्या चार दिवसांपासून त्याची तीव्रता अधिक वाढली. सिलिंडर नसल्याने स्वयंपाकाचा प्रश्न निर्माण झाला. अनेकांनी नातेवाईक, मित्रमंडळी, सहकारी आदींकडून ते उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यात काहीजण यशस्वी ठरले; मात्र अनेकांची अडचण झाली. ग्राहक सिलिंडर मिळण्याच्या प्रतीक्षेत होते.
महामार्गावरून अवजड वाहतूक सुरू झाली. त्यामध्ये जिल्हा प्रशासनाने जीवनावश्यक इंधन, गॅस, आदींची वाहने सोडण्यास सुरुवात केली. त्याअंतर्गत शहरात भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन आॅईल कंपनीचे एकूण १२ ट्रक दाखल झाले. त्यामध्ये भारत पेट्रोलियमचे चार, हिंदुस्थान पेट्रोलियमचे दोन आणि इंडियन आॅईलच्या सहा ट्रकचा समावेश होता. या ट्रकच्या माध्यमातून सुमारे तीन हजार सिलिंडर कोल्हापूरमध्ये उपलब्ध झाले. त्यानंतर वितरकांनी तातडीने सिलिंडरचे वितरण सुरू केले. त्याची माहिती मिळताच, त्या ठिकाणी नागरिकांच्या रांगा लागल्या. सायंकाळी उशिरापर्यंत या रांगा कायम होत्या.
महामार्गावरील वाहतूक सुरू झाल्याने सिलिंडरचे ट्रक शहरात दाखल होत आहेत. सकाळी साडेआठच्या सुमारास ट्रक दाखल झाले. त्यानंतर तातडीने सिलिंडर वितरण सुरू केले.- अभिषेक घोटणे, गॅस वितरक
जिल्ह्यातील गॅस एजन्सींची संख्या
- एचपीसी ५२
- बीपीसी २९
- आयओसी २३
एकूण १०४
जिल्ह्यातील गॅस ग्राहकगॅस कंपनी एक जोडणीधारक दुहेरी जोडणीधारक
- एचपीसी २,१७,५६८ २,९२,७८८
- बीपीसी ९६,६८२ २,२५,५९२
- आयओसी ६२,१३७ ५९,९७९