कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बैठकीची वादळवाट कायम राहील की मनोमिलनातून निवडणुकीची वाट मोकळी होईल, हे उद्या (बुधवारी) ठरणार आहे. महामंडळाच्या खासबाग येथील कार्यालयात सकाळी ११ वाजता बैठक होणार आहे. यात काळजीवाहू अध्यक्षपदाच्या काळातील अनावश्यक खर्च, अंतिम मतदार यादी, कार्यालयीन खर्च, कर्मचाऱ्यांचे पगार, सर्व कार्यालयांची थकीत देणी या विषयांवर चर्चा होणार आहे.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची २०२१ साली मुदत संपल्यानंतर २०२२ साली एकदा हाॅटेल केट्रीमध्ये बैठक झाली होती. मात्र, तोपर्यंत कार्यकारिणीची मुदत संपल्याने या बैठकीला तसा काही फार अर्थ नव्हता. त्यामुळे मुदत संपल्यानंतर तब्बल तीन वर्षांनी कार्यकारिणीतील सर्व सदस्य पहिल्यांदा एकमेकांसमोर येत आहेत. त्यामुळे ही बैठक वादळी होईल की चर्चेतून मनोमिलन होईल, हे बघणे महत्त्वाचे आहे.आता दोन्ही बाजूंनी दोन-दोन पावले मागे येत निवडणुकीसाठीचा मार्ग सुकर करावा आणि सभासदांचा जो निर्णय असेल तो शिरोधार्ह मानून चांगले कामकाज करावे. अन्यथा चित्रपट महामंडळाचे अस्तित्व दखलपात्रसुद्धा राहणार नाही.
कुठे आहे महामंडळ ?गेल्या पाच वर्षांत महामंडळ चांगल्या उपक्रमांसाठी नव्हे तर अंतर्गत राजकारणातून चर्चेत आले आहे. मराठी सिनेसृष्टीपुढील प्रश्न, कोल्हापूरसह राज्यातील अन्य कार्यालयांमधील अडचणी, सभासदांचे प्रश्न यापैकी एकाही विषयावर महामंडळाने ठोस भूमिका घेतलेली नाही. कोल्हापूर चित्रनगरीत एवढ्या मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. भरभरून प्रोजेक्ट येत आहेत. त्यांच्या प्रमोशनसाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. पण महामंडळाचे अस्तित्वच कुठे जाणवत नाही.
बैठकीत वादळी ठरणारे मुद्दे
- काळजीवाहू अध्यक्षपदाच्या काळातील खर्च
- निवडणुकीसाठीची अंतिम मतदार यादी
- धर्मादाय उपायुक्त कार्यालयाने खर्चावर घातलेली बंधने
- फुगलेली सभासद संख्या, त्यावर कार्यकारिणीचा अंतिम ठराव नाही
जाणकार, नव्या पिढीची गरजमहामंडळाचा कारभार पूर्वपदावर आणण्यासाठी मराठी सिनेसृष्टीतील नामवंत कलाकार, जाणकार, नव्या पिढीला आपल्या बरोबरीने नव्या पिढीच्या संकल्पनांना धुमारे देणाऱ्या संचालकांची गरज आहे. त्यासाठी ती क्षमता असलेल्यांनी पुढे येऊन निवडणूक लढणे गरजेचे आहे. हे करताना त्यांचा वैयक्तिक स्वार्थ असू नये, हीच त्यातली महत्त्वाची अट आहे.