कोल्हापूर : विविध शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये राज्य पातळीवर यश संपादन करून महापालिकेच्या शाळांचा नावलौकिक वाढविणा-या श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिरात आपल्या पाल्यांना प्रवेश घेण्यासाठी पालकांची झुंबड उडाली. गुढी पाडव्याच्या पूर्वसंध्येलाच पालकांनी शाळेच्या आवारात रांगा लावल्या होत्या. पोलिस बंदोबस्तात प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली.गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मुलांच्या शालेय शिक्षणाचा श्री गणेशा करण्याची प्रथा आहे. त्यामुळे गुढी पाडव्याला शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची लगबग सुरू असते. जरगनगर येथील कोल्हापूर महापालिकेच्या ल. कृ. जरग शाळेने गेल्या काही वर्षांपासून शैक्षणिक गुणवत्तेत मोठी भरारी घेतली आहे. परिणामी या शाळेत आपल्या मुलांना प्रवेश मिळावा, यासाठी पालकांचा आग्रह असतो. गेल्यावर्षी पहाटेपासून पालकांनी शाळेत प्रवेश प्रक्रियेसाठी गर्दी केली होती. यंदा गुढी पाडव्याच्या पूर्वसंध्येलाच पालकांनी शाळेत रांगा लावल्या.पालक आणि विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेने आवारात मंडप घालून जोरदार तयारी केली होती. प्रवेश प्रक्रियेमध्ये गोंधळ होऊ नये, यासाठी कूपन व्यवस्था करण्यात आली. रात्रभर पालकांना शाळेच्या आवारात थांबावे लागू नये, यासाठी मध्यरात्री दीडच्या सुमारास शाळेकडून पालकांना कूपन देण्यात आले. त्यानंतरही अनेक पालक ठिय्या मारून शाळेच्या आवारात थांबले. सकाळी आठपासून प्रवेश अर्जांचे वाटप सुरू झाले.प्रथम आलेल्या पालकांना प्रथम प्राधान्य यानुसार अर्जांचे वाटप करण्यात आले. पुढील दोन दिवस अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू राहणार असल्याची माहिती मुख्याध्यापिका नीता ठोंबरे यांनी दिली. यावेळी शाळा समितीचे मार्गदर्शक नाना जरग, पर्यवेक्षक युवराज सरनाईक, शिक्षक सुनील पाटील, संदीप जाधव, आदी उपस्थित होते.प्रवेश मर्यादा वाढविलीपहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग असलेल्या जरगनगर शाळेत सध्या सुमारे २२०० विद्यार्थी आहेत. मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमाच्या पहिलीच्या वर्गांसाठी ३०० विद्यार्थ्यांची प्रवेश मर्यादा होती. मात्र, पालकांच्या वाढत्या आग्रहामुळे आणखी ५० विद्यार्थ्यांची क्षमता वाढवल्याचे मुख्याध्यापिका ठोंबरे यांनी सांगितले.
कोल्हापुरातील महापालिकेची शाळा एक नंबरी!, मुलांच्या प्रवेशासाठी पालकांची झुंबड, रात्रभर लावल्या रांगा; पोलिस बंदोबस्तात प्रवेश प्रक्रिया
By उद्धव गोडसे | Published: March 22, 2023 2:09 PM