कोल्हापूर : राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील तीन लाख २५ हजार ८८५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची प्रतीक्षा लागली आहे. प्रशासकीय पातळीवरील विलंबामुळे त्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागणार असल्याचे दिसत आहे. आॅनलाईन प्रक्रियेतील गोेंधळामुळे १ लाख ३८ हजार ३५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरता आलेले नाहीत. अशा स्थितीमुळे या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.गेल्या दोन वर्षांपासून अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी हे शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. सन २०१८ मध्ये या प्रवर्गातील ५,५९,७४३ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती आणि फ्री-शीपसाठी अर्ज केला होता. त्यापैकी ३,९५,२९९ जणांना शिष्यवृत्ती वितरित करण्यात आली, तर १,६१,६४४ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागले.गेल्या वर्षी सन २०१९ मध्ये शिष्यवृत्ती आणि फ्री-शीपकरिता अर्ज केलेल्या ४,३१,०६० विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत १,०५,१७५ जणांना शिष्यवृती मंजूर झाली.उर्वरित ३,२५,८८५ विद्यार्थी अद्याप प्रतीक्षेत आहेत. फ्री-शीपची अवस्था तर त्याहून विदारक आहे.यावर्षी एकूण ४८,२४३ विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. त्यातील ७७२५ जणांना फ्री-शीप मंजूर झाली. त्यातील अवघ्या ८२ विद्यार्थ्यांना आतापर्यंत फ्री-शीप मिळालीआहे.सव्वा लाख अर्ज प्रलंबितयावर्षी ३,८२,८१७ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला. त्यातील संबंधित शिक्षण संस्थांनी १,९९,७२३ अर्ज मंजूर केले, तर १,२८,१०६ अर्ज प्रलंबित आहेत.संस्थांकडून मंजूर होऊन आलेल्या अर्जांपैकी सामाजिक न्याय विभागाने केवळ ९७,४५० विद्यार्थ्यांचे अर्ज मंजूर केले असून, तब्बल १,०२,२७३ अर्ज प्रलंबित आहेत. विशेष म्हणजे विभागाने मंजूर केलेल्या अर्जांपैकी ६०,६४८ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला असून ३६,८०२ विद्यार्थी अजूनही शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत आहेत.कोल्हापूर विभागातील अर्ज मंजूरया शिष्यवृत्तीसाठीची आॅनलाईन प्रक्रिया आहे. कोल्हापूर विभागातील जितक्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीकरिता अर्ज प्राप्त झाले आहेत, ते सर्व मंजूर करून पुढील प्रक्रियेसाठी फॉरवर्ड केले असल्याचे समाजकल्याण विभागाचे कोल्हापुरातील सहायक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी शुक्रवारी सांगितले.
राज्यातील सव्वातीन लाख विद्यार्थी शिष्यवृत्तीविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 12:43 AM