कोल्हापूर : पर्यायी शिवाजी पुलाच्या बांधकामात अडथळा ठरणारा ऐतिहासिक हौद उतरण्याचे काम शनिवारपासून सुरू झाले. गेले अनेक दिवस हा हौद वादग्रस्त बनल्यामुळे साऱ्यांचे लक्ष लागले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या पुलाबाबतच्या रस्त्याच्या अनुषंगाने मोजमाप करून रेखांकन केले. यावेळी सर्वपक्षीय कृती समितीचे कार्यकर्ते व पोलिसही उपस्थित होते. पण दिवसभरात हौदाचा एकही दगड काढला नाही, फक्त सफाईच करण्यात आली.कोल्हापूर-रत्नागिरी मार्गाला जोडणाऱ्या शिवाजी पुलाचे आयुष्य संपल्यामुळे त्याच्या शेजारीच पर्यायी पुलाचे बांधकाम सुरू आहे; परंतु पुलाचे बांधकाम रखडल्यामुळे कोल्हापुरातील सर्वपक्षीय कृती समितीने आंदोलन करून या बांधकामाच्या आड येणारा जकात नाका, पाण्याचा हौद तसेच आठ ते दहा झाडे तोडण्यासाठी आंदोलन केले. आंदोलनात जकात नाक्याची इमारत पाडली, झाडेही तोडली; पण ऐतिहासिक हौद पाडताना लालफितीचा अडथळा आला. शुक्रवारी शिवाजी पुलावर सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिकेचे अधिकारी तसेच सर्वपक्षीय कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी केली. त्यानंतरच हौद उतरण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शनिवारी सकाळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अभय अवटे, शाखा अभियंता प्रशांत मुंगाटे तसेच सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष आर. के. पोवार तसेच कार्यकर्त्यांनी जागेची पाहणी केली. त्यानंतर पर्यायी पुलापुढील नियोजित रस्त्याचे, रस्ता दुभाजकांचे मोजमाप करून त्यांचे रेखांकन केले. यावेळी कृती समितीचे राजू जाधव, महादेव पाटील, सुहास साळोखे, जयकुमार शिंदे, फिरोज खान उस्ताद, रुपाली पाटील, सुजाता चव्हाण, पूजा सुळगावकर, विजया फुले, आदी कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)‘फक्त पडलेली दगडे काढा’४हौद उतरण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांनी दुपारी अधिकारी व कार्यकर्ते गेल्यानंतर शेजारील मंदिरात विसावा घेतला. त्यावेळी त्यांच्याशी चर्चा करताना आम्हाला या हौदाची पूर्वी पाडलेली दगडे व परिसर साफ करण्यास सांगितले आहे. हौद उतरण्याबाबत वरिष्ठांनी कोणतेही आदेश दिले नसल्याचे सांगितले. हौद उतरण्याबाबत आम्हाला काहीही माहीत नसल्याचेही उत्तर काही कर्मचाऱ्यांनी कृती समितीच्या काही कार्यकर्त्यांना सांगितल्याने ते अवाक् झाले. ४हौद काढण्याबाबत संबंधित अधिकारी हुलकावणी देत असल्याचा आरोप नेहमीच सर्वपक्षीय कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी यापूर्वी केलेला आहे. त्यामुळे शनिवारी दिवसभर कर्मचाऱ्यांनी केलेल्या फक्त सफाईच्या कामांमुळे कार्यकर्तेही संभ्रमावस्थेत सापडले होते.
दिवसभर हौदाची फ क्त पाहणी, स्वच्छताच
By admin | Published: May 01, 2016 12:52 AM