कुंभोज : सुमारे वीस हजार लोकवस्तीच्या कुंभोज येथील ग्रामपंचायतीसाठी इच्छुकांची मांदियाळी असताना सर्वपक्षीय स्थानिक नेत्यांचे मात्र निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. निवडणूक बिनविरोध झाल्यास अपेक्षित विकासकामांसाठी मोठा निधी मिळविण्याचा इरादा असला तरी काही नेत्यांतील आत्मविश्वासाची कमी, कार्यकर्त्यांतील गैरमेळ तसेच सक्षम उमेदवारांची वानवा यामुळे सर्व जागा बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे.
हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील निर्णायक मतांचे गाव म्हणून ओळखले जाणाऱ्या कुंभोज ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील संभाव्य लढतीसाठी काँग्रेस, शिवसेना, स्वाभिमानी, राष्ट्रवादी यांच्या महाआघाडीशी भाजप, जनसुराज्य तसेच जयशिवराय किसान संघटना यांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. आरपीआय, वंचित बहुजन आघाडी,प्रल्हाद संघटना तसेच मनसेतूनही हालचाली गतिमान झाल्या आहेत.
सहा प्रभागांतील सतरा जागांसाठी ६६ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत बिनविरोधसाठी झालेल्या बैठकीत चिठ्ठ्या टाकून उमेदवार निवडण्याबाबत चर्चा झाली. तथापि याविषयी एकमत होण्याची शक्यता कमी आहे. आज, गुरुवारी पुन्हा बैठक आयोजित केली असून बिनविरोधसाठी नेतेमंडळी किती आत्मविश्वासपूर्वक प्रयत्न करतात, त्यावर पुढील चित्र स्पष्ट होणार आहे. बिनविरोधसाठी गावहिताचा विचार करता खुर्चीसाठी नव्हे तर गावच्या विकासासाठी वाहून घेणाऱ्यांना संधी द्यावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
............
प्रभाग-६
एकूण जागा-१७
एकूण मतदान-१०५३७
उमेदवारी अर्ज दाखल संख्या-६६