कोल्हापूर : राजकीय वैरत्वामुळे एरव्ही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडणारे लोकप्रतिनिधी खंडपीठ कृती समितीच्या बैठकीच्या निमित्ताने रविवारी एकाच व्यासपीठावर होते. माजी पालकमंत्री सतेज पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांनी एकमेकांचा आदरपूर्वक उल्लेख करीत केलेल्या कामांचे कौतुक केले. पाटील-क्षीरसागर यांनी कानगोष्टी करीत कोल्हापूर उत्तरच्या जागेवरून मिश्कील टिपणी केल्या, तर खासदार शाहू छत्रपती यांनी अध्यक्षीय भाषणातून कोपरखळ्या दिल्या. त्यामुळे गंभीर विषयावरील बैठकीतही हास्याचे फवारे उडत राहिले.खंडपीठ कृती समितीच्या सर्वपक्षीय बैठकीत निमंत्रक ॲड. सर्जेराव खोत यांनी प्रास्ताविकातून राजकीय इच्छाशक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने बैठकीला काहीसा गंभीर सूर लागला होता. मात्र, लोकप्रतिनिधींनी संघर्षाऐवजी सहकार्याची भूमिका घेत राजकीय परिपक्वता दाखवली. माजी पालकमंत्री सतेज पाटील आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यात सुरुवातीपासूनच कानगोष्टी सुरू होत्या. सतेज पाटील आणि खासदार धनंजय महाडिक हे एकाच व्यासपीठावर असल्याने त्यांच्याकडे सर्वांचे लक्ष होते. पाटील यांनी बोलताना महाडिक यांच्या नावाचा उल्लेख केला. महाडिक यांनीही पाटील यांच्या नावाचा उल्लेख करत सकारात्मक प्रतिसाद दिला. क्षीरसागर यांनी सर्वांचाच उल्लेख मित्र असा केला.बैठकीचे अध्यक्ष खासदार शाहू छत्रपती यांनी संधी साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार धैर्यशील माने यांना शाब्दिक कोपरखळ्या घातल्या. पत्र पाठवून तीन महिने झाले तरी मला मुख्यमंत्री कार्यालय आणि खासदार माने यांच्याकडूनही काही प्रतिसाद मिळाला नाही. खंडपीठाच्या निर्णयाप्रमाणेच हा विलंब असल्याची टिपणी करताच सभागृहात हशा पिकला. तसेच क्षीरसागर आणि माने यांनी लागलीच मुख्यमंत्र्यांना फोन करून भेटीचा दिवस ठरवण्याचा आग्रह त्यांनी धरल्याने दोन्ही नेत्यांची कोंडी झाली होती. मात्र, सतेज पाटील यांनी प्रसंग लक्षात घेऊन ते भेटून वेळ घेतील, असे सांगत कोंडी फोडली. यानिमित्ताने बैठकीत राजकीय मिश्किली अनुभवायला मिळाली.सिट सुटली काय?आम्हाला निवडणूक लढवायची आहे. खंडपीठाचा निर्णय घ्या, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले. यावर तुमच्यासाठी सिट सुटली काय? असा प्रश्न सतेज पाटील यांनी केला. हे माझ्यापेक्षा तुम्हालाच जास्त माहिती आहे, असे प्रत्युत्तर देत मी निवडून येणारच असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.
कोल्हापुरात खंडपीठ बैठकीत रंगली राजकीय टोलेबाजी, सतेज पाटील-क्षीरसागर यांच्या कानगोष्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 3:47 PM