कोल्हापूर : रहायला जागा नाही म्हणून आम्ही गायरानामध्ये घरं बांधली आहेत. न्यायालयाने सांगितलंय म्हणून जरी काही गडबड सुरू असली तरी गायरानातील एकाही घराला हात लावू देणार नाही असा खणखणीत इशारा आज, मंगळवारी सर्वपक्षीय मोर्चाव्दारे प्रशासनाला देण्यात आला. या मोर्चामध्ये शिंदे गट आणि भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले नव्हते.आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या सभेमध्ये अनेकांनी राज्य सरकारला लक्ष्य केले. माजी मंत्री हसन मुश्रीफ, आमदार ऋतुराज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार के. पी. पाटील, चंद्रदीप नरके, उल्हास पाटील, संपतराव पवार-पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहूल पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, आरपीआयचे प्रा. शहाजी कांबळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी भगवान कांबळे यांच्याकडे मागण्यांचे निवेदन देण्यात आले. उच्च न्यायालयाचा आदेश असला तरीही इतर कोणत्याही जिल्ह्यात तातडीने प्रक्रिया सुरू नसताना कोल्हापूर जिल्ह्यातच गडबड का सुरू आहे असा सवाल यावेळी माजी मंत्री मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी प्रशासनाला विचारला.
गायरानातील एकाही घराला हात लावू देणार नाही, कोल्हापुरात सर्वपक्षीय मोर्चाव्दारे प्रशासनाला इशारा
By समीर देशपांडे | Published: November 15, 2022 2:33 PM