कोल्हापूर : कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीच्यावतीने रविवारी (दि. २१) हद्दवाढीच्या समर्थनार्थ सर्वपक्षीय व्यापक मेळावा होत आहे. शाहू स्मारक भवनातील मिनी सभागृहात दुपारी साडेचार वाजता हा मेळावा होईल. त्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समितीचे निमंत्रक आर. के. पोवार यांनी केले आहे.नगरपालिकेचे १९७२ ला महापालिकेत रूपांतर झाले त्यानंतर आजअखेर हद्दीमध्ये एक इंचही वाढ झालेली नाही. महापालिका स्थापन झाल्यापासून गेल्या चाळीस वर्षांत वारंवार हद्दवाढ करावी म्हणून महापालिका व शहरवासीयांकडून पाठपुरावा सुरू आहे; परंतु शहर विकासाकडे दुर्लक्ष करून मूठभर लोकप्रतिनिधींच्या विरोधामुळे शासन शहराच्या हद्दवाढीचा निर्णय घेण्यास असमर्थ ठरत आहे.महाराष्ट्रातील इतर महापालिका व नगरपालिकांच्या हद्दी वाढून त्या शहरांचा झपाट्याने विकास झाला आहे परंतु संकुचित वृत्तीमुळे काही लोक शहर हद्दवाढीला विरोध करत आहेत. शहराच्या विकासाबरोबरच शहरामध्ये येणाऱ्या ग्रामीण भागांचाही सर्वांगीण विकास होणार आहे, ही बाब हद्दवाढीस विरोध करणाऱ्यांनी नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, सांगली, मिरज व कुपवाड येथे जाऊन पाहावी.हद्दवाढ मंजूर व्हायची असेल, तर त्यासाठी राज्यशासनावर शहरवासीयांचा दबाव निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठीच सर्व राजकीय पक्ष, संस्था संघटना यांचा मेळावा घेण्यात येत आहे. (प्रतिनिधी)हद्दवाढ करावीच लागेल : नगरविकास राज्यमंत्रीवाढती लोकसंख्या व सेवा-सुविधा यामुळे कोल्हापूर शहराची हद्दवाढ करावीच लागेल. सर्वांची संमती घेऊन टप्या-टप्प्याने हद्दवाढ केली जाईल, असे नगरविकासमंत्री रणजित पाटील यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, हद्दवाढीसाठी महानगरपालिकेने सुधारित प्रस्ताव देणे गरजेचे आहे. असा प्रस्ताव आल्यास सकारात्मक भूमिका घेणार आहे. हद्दवाढीत येणाऱ्या सर्व गावांची संमती घेऊनच हद्दवाढीचा निर्णय घेतला जाईल.कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हायची असेल तर सर्वच राजकीय पक्षांनी एकजूट करून संघटितपणे शासनाकडे त्यासाठी आग्रह धरला पाहिजे. शहराशेजारची गावे महापालिकेच्या सेवांचा लाभ घ्यायला पुढे आहेत आणि हद्दवाढ म्हटली की विरोधालाही पुढे हा दुटप्पीपणा आहे. हद्दवाढ कशी आवश्यक आहे हे आम्ही शासनाला पटवून देण्याचा प्रयत्न करू.- आर. के. पोवार, निमंत्रक, हद्दवाढ कृती समिती
हद्दवाढीच्या समर्थनार्थ उद्या सर्वपक्षीय मेळावा
By admin | Published: June 20, 2015 12:05 AM