कोल्हापूर : संघर्ष केल्याशिवाय कोल्हापूरला काही मिळत नाही, म्हणूनच आता शहराची हद्दवाढ आणि सर्किट बेंचसाठी रस्त्यावरच्या लढाईसाठी सज्ज राहा, असे आवाहन सोमवारी येथे झालेल्या सर्वपक्षीय हद्दवाढ, सर्किट बेंच कृती समितीच्या बैठकीत करण्यात आले. या लढाईचा पहिला टप्प्या ठरविण्यासाठी दि. ११ सप्टेंबरला व्यापक मेळावा घेण्याचेही यावेळी ठरले. दोन्ही प्रश्नांची सोडवणूक झाल्याशिवाय आपली रस्त्यावरील लढाई मागे घ्यायची नाही, प्रसंग आलाच तर मुख्यमंत्र्यांच्या दारात जाऊन आंदोलन केले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.कोल्हापूर शहराची हद्दवाढ व सर्किट बेंच प्रश्नी सोमवारी महाराणा प्रताप चौक येथे कृती समितीची बैठक झाली. अध्यक्षस्थानी माजी महापौर आर. के. पोवार होते. हद्दवाढ, सर्किट बेंच प्रश्नी बरीच आंदोलने झाली. मुख्यमंत्र्यांच्या गाठीभेटी झाल्या, बैठका झाल्या. परंतु, कोणत्याही सरकारने त्याबाबत औदार्य दाखविले नाही. त्यामुळे आता सरकार कोणाचेही असो मागे हटायचे नाही. ज्या पद्धतीने टोलसाठी आक्रमक आंदोलन उभारले त्याच धर्तीवर आंदोलन उभारले जाईल, त्यासाठी सर्वांनी तयार राहावे, असे आवाहन करण्यात आले.यावेळी सुभाष जाधव, अनिल कदम, बाबा पार्टे, महादेवराव आडगुळे यांची भाषणे झाली. यावेळी बार असो.चे अध्यक्ष गिरीष खडके, ॲड. प्रशांत चिटणीस, दिलीप पवार, लाला गायकवाड, अशोक भंडारे, पूजा साळोखे, शीतल तिवडे, सुमन वाडेकर उपस्थित होते.
११ सप्टेंबरला बैठक
आंदोलनाचा पुढील टप्पा ठरविण्यासाठी ११ सप्टेंबरला शाहू स्मारक भवनात व्यापक मेळावा आयोजित करण्यात येईल, असे महाराष्ट्र, गोवा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष विवेक घाटगे यांनी सांगितले.
कोण काय म्हणाले -
बाबा इंदूलकर : जोपर्यंत आंदोलन तीव्र होणार नाही तोपर्यंत सरकार आपल्या मागण्यांकडे गांभीर्याने बघणार नाही. त्यामुळे आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. हद्दवाढ झाल्याशिवाय महापालिका निवडणूकही होऊ द्यायची नाही.आर. के. पोवार : गेली अनेक वर्षे आंदोलने सुरू आहेत. कोणतेही सरकार आमच्या मागण्याकडे लक्ष देत नाही. आता निर्णायक आंदोलन करून सरकारला निर्णय घेणे भाग पाडूया.दिलीप देसाई : सरकारने सर्व प्रथम ४२ गावांचे प्राधिकरण स्थापन केले आहे, त्यातील हद्दवाढीत समावेश असलेली गावे प्राधिकरणातून वगळण्यात यावीत.राजू जाधव : आमदार, खासदारांचे बंगले कोल्हापुरात असून हद्दवाढीला विरोध करतात, हे चुकीचे आहे. यापुढे दुहेरी भूमिका घेतलेली चालणार नाही.संदीप देसाई : मुख्यमंत्र्यांच्या दारात बसून आंदोलन करूया. जोपर्यंत मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत उठणार नाही, अशी भूमिका घेऊया.किशोर घाडगे : जिल्ह्यातील काही नेते शहरात एक आणि गावात एक अशा दुहेरी भूमिका घेतात. त्यांचा बुरखा फाडण्याची आवश्यकता आहे.ॲड. विवके घाटगे : मुख्यमंत्री व मुख्य न्यायाधीश यांची बैठक ठरली आहे. महिन्याभरात चर्चेच्या माध्यमातून सर्किट बेंचचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे.