निपाणी : बंगळूरु येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व बेळगाव येथे क्रांतिवीर संगोळी रायन्ना यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ आज निपाणी शहरात सर्वपक्षीय कडकडीत बंद पाळण्यात आला. मध्यवर्ती शिवाजी चौक येथील शिवपुतळ्याला दुग्धाभिषेक व विधिवत पूजा झाल्यानंतर हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत निपाणी शहरातून मोर्चा काढला.शहरातील व्यापाऱ्यांनी या मोर्चात आपले सर्व व्यवहार बंद ठेवून सहभाग नोंदवला. शनिवारी सर्वपक्षीय झालेल्या बैठकीत बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सकाळी साडे नऊ वाजल्यापासूनच मध्यवर्ती शिवाजी चौक येथे शिवप्रेमींनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. यानंतर विधिवत पूजा झाल्यानंतर शिवपुतळ्या दुग्धाभिषेक करण्यात आला. यानंतर मध्यवर्ती शिवाजी चौक ते तहसीलदार कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला.
मोर्चाच्या अग्रभागी बाल शिवाजीच्या रूपातील विराज पाटील हा चिमुकला होता. व अन्य पाच मुली भगवा ध्वज घेऊन मोर्चाच्या अग्रभागी होत्या. मोर्चात हजारोंच्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित झाले होते. या मोर्चाला माजी मंत्री विरकुमार पाटील, माजी मंत्री काकासाहेब पाटील, माजी आमदार प्रा. सुभाष जोशी, यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवक, मान्यवर हजारो शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.