कोल्हापूर : नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार पूत्र श्रीकांत शिंदे वगळता राज्यातील शिवसेनेचे सर्व खासदार हे पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशीच एकनिष्ठ आहेत. आमदारानंतर आता खासदारही शिवसेनेतून फुटणार, अशी सुरू असलेली चर्चा केवळ अफवाच आहे, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला.
शिवसेनेत घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर पक्षाची पुढील भूमिका काय राहणार यासंबंधी माहिती देण्यासाठी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, राज्यात शिवसेनेचे एकूण १८ खासदार आहेत. यातील श्रीकांत शिंदे व आणखी एखादा, दुसरा खासदार वगळता उर्वरित सर्व खासदार शिवसेनेसोबत राहतील. शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी दिल्लीत काही खासदारांची बैठक झाल्याचे सांगत आहेत. पण ज्यांच्या घरात बैठक झाली असे म्हणतात. त्यांनीच अशी कोणतीही बैठक झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे.
शिवसेनेतून बाहेर पडणार, असे सांगितल्या जाणाऱ्या खासदारांची एक यादी वॉटसअॅपवर फिरत आहे. त्यामध्ये माझेही नाव आहे. पण मला शिवसेनेतून बाहेर पडण्यासंबंधी कोणीही विचारणा केलेली नाही. मी आणि जिल्ह्यातील शिवसेनेचे दुसरे खासदार धैर्यशील माने हेही ठाकरे यांच्यासोबतच आहेत आणि कायमपणे राहू..