कोल्हापूर : अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सलग दुसऱ्यादिवशी महाराष्ट्र राज्य विद्यापीठ व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीतर्फे आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षा कामकाजावर परिणाम झाला आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील आज, शुक्रवारी व उद्या शनिवारी होणाऱ्या सर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी पत्रकाद्वारे दिली.विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील अभ्यासक्रमाच्या परीक्षा विविध परीक्षा केंद्रांवर सुरू आहेत. मात्र, विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संघटनेने गेल्या काही वर्षांपासून आपल्या मागण्यांबाबत पाठपुरावा सुरू केला आहे . मात्र, त्या अद्यापही विद्यापीठ प्रशासन व राज्य शासनाने मान्य केलेल्या नाहीत. शिवाजी विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील परीक्षांच्या पार्श्वभूमीवर सेवक संघासह संयुक्त कृती समितीने आंदोलनाचे हत्यार उगारले आहे.त्यामुळे गुरुवारपासून विद्यापीठ प्रशासनाच्या परीक्षा कामकाजावर बहिष्कार टाकत शिवाजी विद्यापीठ सेवक संघाने आंदोलनाला सुरुवात केली. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारल्याने विद्यापीठाच्या परीक्षेच्या नियोजनावर परिणाम झाला. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने गुरुवारच्या सर्व परीक्षा स्थगित केल्या होत्या.दरम्यान, संयुक्त कृती समिती आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात झालेल्या चर्चेतून कोणताही मार्ग न निघाल्याने शिवाजी विद्यापीठात सेवक संघ आंदोलन सुरू ठेवण्यावर ठाम आहे. परिणामी शिवाजी विद्यापीठ प्रशासन व परीक्षा विभागाने आज, शुक्रवारी व उद्या शनिवारी (दि. ४) होणाऱ्या सर्व परीक्षाही स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.निर्णय न झाल्यास आंदोलनाची धार वाढविणारसेवक संघाने पुकारलेल्या आंदोलनाअंतर्गत १४ फेब्रुवारी निदर्शने, तर १५ ला काळ्या फिती लावून सर्व कर्मचारी कामकाज करणार आहेत. गुरुवारी (दि.१६) एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे. मुदतीपर्यंत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत तोडगा निघाला नाही, तर पुन्हा २० फेब्रुवारीपासून शिवाजी विद्यापीठाचे शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलनात सहभागी होणार आहेत, अशी माहिती सेवक संघाचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी दिली.विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमकृती समिती व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात मागण्यांबाबत चर्चा झाली. मात्र, तोडगा न निघाल्याने शिवाजी विद्यापीठ सेवक संघाने संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आंदोलनाचा फटका परीक्षांना बसला आहे. तीन दिवस परीक्षा स्थगित झाल्याने त्या कधी होणार, याबाबत विद्यापीठ प्रशासनाने जाहीर केलेले नाही. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमावस्थेत आहेत.
शिवाजी विद्यापीठाच्या सर्व परीक्षा आज, उद्या स्थगित; कर्मचारी आंदोलनाचा परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2023 1:18 PM