कोल्हापूर : कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट कमी झाल्याने कोल्हापूर शहरातील सर्व दुकाने सोमवार (दि.२८) पासून सुरू होण्याची शक्यता आहे. पॉझिटिव्हिटी रेट कमी होत असल्याने सोलापूर शहराप्रमाणे कोल्हापूर हे स्वतंत्र युनिट करता येईल का? याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पालकमंत्री सतेज पाटील आज, बुधवारी चर्चा करून निर्णय घेणार आहेत.सरसकट दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिजतर्फे आयोजित बैठकीत व्यापारी, व्यावसायिकांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे केली होती. त्यावर कोरोनाबाबतच्या तपासणीचे रोजचे प्रमाण १५ हजारांपर्यंत आहे. शहराचा पॉझिटिव्हिटी रेट साडेनऊ टक्क्यांपर्यंत आहे.
दोन-तीन दिवसांत तो ७-८ टक्क्यांपर्यंत येईल, असे दिसते. त्यामुळे कोल्हापूर शहर स्वतंत्र युनिट करून सर्व दुकाने सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासमवेत मंगळवारी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले होते. मात्र, काही कारणास्तव त्यांना मंगळवारी मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा करता आली नाही. ते याबाबत बुधवारी चर्चा करणार आहेत.
दरम्यान, सलग तिसऱ्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट हा कमी आला आहे. हा रेट बुधवारी ४.६९ टक्क्यांवर आला आहे. शहरातील कोरोनाची लाटदेखील ओसरत आहे. मृत्यूदर ०.७ टक्क्यांवर आला आहे. हे चित्र सकारात्मक आहे. त्यामुळे शहरातील सर्व दुकाने सोमवारपासून सुरू होण्याची शक्यता आहे.
व्यापारी, व्यावसायिकांनी केलेल्या मागणीनुसार सर्व दुकाने सुरू करण्याबाबत परवानगी देण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत मंगळवारी चर्चा झाली नाही. या विषयावर बुधवारी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.- सतेज पाटील,पालकमंत्री.
शहरातील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी होत असून ते चांगले आहे. त्यामुळे सोलापूरप्रमाणे कोल्हापूर हे स्वतंत्र युनिट होऊन सोमवारपासून सर्व दुकाने सुरू करण्यास परवानगी निश्चितपणे मिळेल.-संजय शेटे,अध्यक्ष, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स.