कोल्हापूर : मागील आठवड्यात काेल्हापूर जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट १२.२ टक्के इतका राहिल्याने शुक्रवारी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यासाठी लागू असलेले स्तर ४ चे निर्बंध पुढील आदेशापर्यंत कायम ठेवले. यामुळे आज, शनिवारपासून जिल्ह्यातील अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने पुन्हा बंदच राहणार आहेत. दुसरीकडे, व्यापाऱ्यांनी सोमवारपासून दुकाने उघडण्याचा निर्णय घेतल्याने पुढील दोन दिवसांत शासन स्तरावर काही निर्णय होतील का, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.
राज्य शासनाने ठरवून दिलेल्या निकषांनुसार जिल्ह्यावरील निर्बंध कमी करायचे असतील तर मागील आठवड्याच्या पॉझिटिव्हिटी रेटचा विचार करून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या बैठकीत निर्णय घेतला जातो. जिल्ह्याचा १ ते ७ जुलैदरम्यानचा पॉझिटिव्हिटी रेट १२.२ टक्के आहे. त्यानुसार कोल्हापूरचा समावेश अजूनही स्तर ४ मधील जिल्ह्यांमध्ये आहे. याबाबत शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक झाली व राज्य शासनाच्या निकषांनुसार जिल्ह्यावरील स्तर ४ च्या निर्बंधांना पुढील आदेशापर्यंत मुदतवाढ देण्यात आली. याबाबतचे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी शुक्रवारी रात्री काढले.
सलग तीन महिने दुकाने बंद असल्याने व्यापाऱ्यांमध्ये वाढता असंतोष लक्षात घेऊन राज्य शासनाने सोमवार ते शुक्रवार हे पाच दिवस कोल्हापूर शहरातील सरसकट दुकाने उघडण्यास परवानगी दिली होती. या आठवड्यातील पॉझीटिव्हिटी रेटचा विचार करून पुढील निर्णय घेण्यात येणार होता. सध्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट १६ वरून १२ टक्क्यांवर आला असला तरी निर्बंध कमी करायचे असतील तर तो १० च्या आत यावा लागतो. त्यामुळे अजूनही जिल्ह्यावरील निर्बंध कायम असून जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता सरसकट दुकाने पुन्हा बंद ठेवावी लागणार आहेत.
----
दुकाने सुरू राहण्यासाठी पाठपुरावा करणार
दुकाने सुरू असतानादेखील गुरुवारपर्यंत कोल्हापूर शहराचा पॉझिटिव्हिटी रेट ९.२० टक्के इतकाच असल्याने येथील सरसकट दुकाने सुरू राहण्यात काहीच अडचण नाही. त्यामुळे मागील आठवड्याप्रमाणे आम्ही शासनाकडे पाठपुरावा करू. दुकाने सुरूच राहतील यासाठी प्रयत्न करणार आहोत.
संजय शेटे (अध्यक्ष, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स)
--