शासनाने सर्व व्यापारी आस्थापने सुरू ठेवण्याबाबत गुरुवारपर्यंत निर्णय घेतला नाही, तर त्याबाबत पुढील दिशा ठरविण्यासाठी बैठक घेण्याचे कोल्हापूर चेंबरने जाहीर केले होते. त्यानुसार शुक्रवारी विविध संलग्नित संघटनांचे प्रतिनिधी, व्यापारी, व्यावसायिकांची बैठक झाली. त्यामध्ये सुरुवातीला कोल्हापूर चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे यांच्यासमवेत झालेल्या चर्चेची माहिती दिली. त्यानंतर राज्यपातळीवरील संघटनांच्या सूचनेनुसार आणि सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझरचा वापर, कोरोनाबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून सर्व दुकाने सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. रात्री आठनंतर दुकाने सुरू ठेवू नयेत. शनिवार, रविवारच्या विकेंड लॉकडाऊनचे पालन करावे, असे आवाहन संजय शेटे यांनी केले. कोल्हापूर चेंबरचे उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार, संजय पाटील, सचिव जयेश ओसवाल यांनी मार्गदर्शन केले. तौफिक मुल्लाणी, कुलदीप गायकवाड, जयंत गोयाणी, अजित कोठारी, आदींनी काही सूचना केल्या. यावेळी
हरिभाई पटेल, धनंजय दुग्गे, वैभव सावर्डेकर, राजू पाटील, प्रशांत शिदे, राहुल नष्टे, संपत पाटील, अनिल धडाम, प्रकाश केसरकर, प्रदीप भारमल, सीमा जोशी, शिवानंद पिसे, धर्मपाल जिरगे, अतुल शहा उपस्थित होते. दरम्यान, दुकाने सुरू ठेवण्याबाबत राज्यभरातील व्यापारी, व्यावसायिकांनी केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी दोन दिवसांमध्ये निर्णय घेऊ, असे सांगितले. त्यानुसार कोल्हापुरातील व्यापारी, व्यावसायिकांनी शुक्रवारीदेखील दुकाने बंद ठेवली. काहीजणांनी सकाळी दुकाने सुरू करण्याबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनाही दुकाने बंद ठेवण्याची सूचना कोल्हापूर चेंबरने केली. अत्यावश्यक सेवेतील दुकाने वळगता अन्य दुकाने बंद राहिली. त्यामुळे महाद्वार रोड, ताराबाई रोड, राजारामपुरी, शाहूपुरी, आदी परिसरातील बाजारपेठांमध्ये शुकशुकाट दिसून आला.
चौकट
‘मास्क नाही, तर प्रवेश नाही’
मास्क, सॅनिटायझरच्या वापराचे काटेकोरपणे पालन करा. मास्क नसलेल्या ग्राहकांना दुकानात प्रवेश देऊ नका. सकाळी सात ते रात्री आठ यावेळेत दुकाने सुरू ठेवा, असे आवाहन जयेश ओसवाल यांनी व्यापारी, व्यावसायिकांना केले.